आपल्या कर्मचाऱ्यांनी नियम पाळलेच पाहिजेत आणि नियम मोडणाऱ्याला कशी अद्दल घडवली जाते, हे दाखवणारा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीट बेल्ट लावून गाडी चालवली नाही म्हणून बॉसने आपल्या महिला कर्मचाऱ्याला चक्क चिकटपट्टीने भिंतीला चिटकवलं. कदाचित हा प्रकार पाहून आपल्याला हसू येईल पण चीनमधल्या एका कंपनीत खरोखरच अशी घटना घडली आहे.
वाचा : मद्यधुंद तरुणांनी अभिनेत्रीला भररस्त्यात काढायला लावल्या उठाबशा
चीनच्या ‘व्हिबो’ सोशल मीडिया साईटवर तिचा फोटो शेअर करण्यात आला त्यानंतर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याने हा फोटो शेअर केला आहे. आमच्या बॉसने ऑफिसमधील एका महिलेला सीटबेल्ट न लावता गाडी चालवताना पाहिले. त्यानंतर बॉसने तिला शिक्षा म्हणून चिकटपट्टीने भिंतीवर टांगले. आमच्या कंपनीत वाहतुकीचे निमय मोडणाऱ्यांना अशी शिक्षा दिली जाते, असंही या कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. ती अशा अवस्थेत असताना इतर कर्मचाऱ्यांनी मात्र तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं पसंत केलं.
तिचा फोटो शेअर करताना कर्मचाऱ्यांनी कंपनीतल्या इतरही काही नियमावलींचा फोटो शेअर केला. कंपनीत उशिरा येणं आणि वेळेच्या आधी निघणं नियमांविरुद्ध आहे. नियम मोडणाऱ्यांवर अशी जगावेगळी कारवाई केली जाते. मासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. जर एखाद्या पुरुष कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा प्रेयसीला मासिक पाळीदरम्यान त्रास होत असेल तर तिची काळजी घेण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येते, असेही या कर्मचाऱ्याने सांगितले.