Unique Divorce Mehndi Viral Video : महिलांना मेहंदी काढण्याची भारीच हौस असते. घरात कोणता सण वा समारंभ असो किंवा लग्नसोहळा; हातावर मेहंदी काढल्याशिवाय तो अपूर्ण वाटतो. त्यानिमित्ताने महिला हातावर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर मेहंदी काढताना दिसतात. मेहंदीमुळे हातांचे सौंदर्य वाढत नाही, तर त्यामुळे तुम्हालाही एक वेगळा आनंद, उत्साह वाटतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या मेहंदी डिझाइनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. आता तुम्ही विचार करीत असाल की, त्यात काय एवढं काय खास आहे? यात खास म्हणजे ही मेहंदी कोणत्याही लग्न समारंभासाठी नाही, तर घटस्फोट साजरा करण्यासाठी काढली होती.
घटस्फोटानंतर मेहंदी काढून केला आनंद साजरा
एका महिलेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिने हातावर मेहंदी काढून लग्नापासून ते घटस्फोटापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. महिलेने तिच्या आयुष्यातील एक मोठा बदलाचा आनंद अतिशय खास आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
घटस्फोटानंतरचे स्वातंत्र्य आणि नवीन आयुष्याची सुरुवात तिने हातावर मेहंदी लावून साजरा केला आहे. ही पद्धत केवळ वेगळीच नाही, तर अनेकांसाठी प्रेरणादायीदेखील आहे.
लग्नापासून घटस्फोटापर्यंतचा प्रवास
तिने हातावर तीन भागांत मेहंदी डिझाइन्स काढल्या आहेत. पहिल्या भागात तिने एक प्रियकर प्रेयसीला प्रपोज करताना दिसतोय. दुसऱ्या भागात लग्नानंतरची पती-पत्नीतील भांडण आणि प्रेम एका वजनकाट्यात तोलताना दाखवलं आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या भागात घटस्फोटाचे चित्रण म्हणून एका तुटलेले हृदय काढून दाखवले आहे.
हा व्हिडीओ @mehandibysandhyayadav नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे; तर काहींनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत टीकाही केली.
एका युजरने लिहिलेय, “यावरून हे सिद्ध होते की, दोघेही वेगळे झाल्यानंतर अधिक आनंदी आहेत.” दुसऱ्याने लिहिलेय, “आता हे फक्त हेच पाहायचे बाकी होते.” तिसऱ्या एकाने लिहिलेय, “लग्न आधीच एक थट्टेचा विषय करून ठेवला आहे. आता घटस्फोटदेखील थट्टा बनत आहे.”