Air India Servers Chicken to Vegetarian Woman : एअर इंडियाच्या विमानात शाकाहारी महिलेने जेवण मागवलं. तिला शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे आढळले. ज्यानंतर तिने या जेवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वीरा जैन असं या महिलेचं नाव आहे. तिने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्यासह घडलेला प्रकार सांगितला आहे.
काय म्हणाल्या वीरा जैन त्यांच्या पोस्टमध्ये?
वीरा जैन या महिलेने तिला आलेला अनुभव सांगितला आहे. त्यांच्या पोस्टनुसार कालीकत विमानतळावरुन त्यांनी एअर इंडिया विमान क्रमांक AI 582 मधून प्रवास सुरु केला. प्रवासाच्या वेळी त्यांनी शाकाहारी जेवण मागवलं. त्यावेळी त्यांना जे जेवण शाकाहारी म्हणून देण्यात आलं त्यात चिकनचे तुकडे होते. वीरा जैन यांनी लिहिलं आहे की माझं विमान ६.४० ला उड्डाण करणार होतं. मात्र या विमानाने ७.४० ला म्हणजेच एक तास उशिरा उड्डाण केलं. तसंच त्यांनी जेवण ज्या वेष्टणात देण्यात आलं त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. या वेष्टणावर शाकाहारी (VEG) असं लिहिलं आहे. मात्र आतल्या जेवणात चिकनचे तुकडे आढळून आले.
केबीन क्रूला सांगितला सगळा प्रकार
केबिन क्रू मेंबर सोना यांना जेव्हा वीरा जैन यांनी हा प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी माफी मागितली. त्यानंतर इतर दोन प्रवाशांनाही जेवणाबाबत सांगितलं गेलं नाही. तसंच माझ्या मित्राची ट्रेन विमानाने उशिरा उड्डाण केल्यामुळे चुकली असंही या महिलेने म्हटलं आहे. वीरा जैन यांचं म्हणणं आहे की आम्हाला वेळेत मुंबईत पोहचायचं होतं त्यामुळे आम्ही विमानाचं तिकिट काढलं होतं. हे विमान रात्री ८.४० ला येणं अपेक्षित होतं. मात्र या विमानाला उशीर झाला.
वीरा जैन यांनी आणखी काय म्हटलं आहे?
एका पाठोपाठ एक पोस्ट करत वीरा जैन म्हणाल्या आधी विमानाचं उड्डाण उशिराने, त्यानंतर शाकाहारी भोजनात चिकनचे तुकडे या सगळ्या गोष्टी निराशाजनक आहेत. एअर इंडियाने त्यांची विमानात जेवण देणारी सेवा सुधारली पाहिजे असंही वीरा जैन म्हणाल्या आहेत. तसंच प्रवाशांनी त्यांना कुठलं जेवण दिलं जातं आहे ते पडताळून पाहिलं पाहिजे असं त्या म्हणाल्या आहेत. मला ज्या प्रकारे व्हेज जेवणाच्या नावाखाली चिकनचे तुकडे असलेलं जेवण दिलं गेलं त्यामुळे माझा आता विमानात मिळणाऱ्या जेवणावरुन विश्वासच उडाला आहे असंही वीरा जैन म्हणाल्या आहेत. इंडिय एक्स्प्रेसने या बाबतचं वृत्त दिलं आहे.