Woman removed her clothes in flight: एका धक्कादायक घटनेत एका महिला प्रवाशाने फिनिक्सला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानात नग्न होऊन, ते विमान गेटवर परत नेण्यास भाग पाडले. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ती महिला अचानक ओरडू लागली आणि तिचे कपडे उतरवू लागली कारण- तिला विमानातून उतरायचे होते. सोमवारी ह्युस्टनहून अमेरिकेतील फिनिक्सला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या फ्लाइट ७३३ मध्ये ही घटना घडली.
स्थानिक वृत्तानुसार, महिलेने सहप्रवाशांना मारहाण करण्यास आणि विमान परिचारिकांना त्रास देण्यास सुरुवात केली. एका प्रवाशाने KHOU-TV ला सांगितले की, ती महिला विमानातील इतर प्रवाशांकडे वळली आणि नग्न झाली.
दरम्यान, दुसऱ्या एका प्रवाशाने केपीएनएक्स-टीव्हीला सांगितले की, ती महिला वर-खाली उड्या मारू लागली आणि त्यामुळे तिला मानसिक त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले. सहप्रवाशाने पुढे सांगितले की, महिलेने स्वतःला बायपोलर -Bipolar disorder (एक मानसिक आजार ज्यामध्ये मूड स्विंग्स होतात) असल्याचा दावा केला. एका प्रवाशाने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला पूर्णपणे नग्नावस्थेत चालताना दिसत होती. ती जोरजोरात ओरडत असल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसून येतेय.
जेव्हा विमान ह्युस्टनच्या हॉबी विमानतळाच्या गेटवर परतले तेव्हा कर्मचाऱ्यांनी महिलेला ब्लँकेटने झाकल्याचे वृत्त आहे. तथापि, तिने ते ब्लँकेट काढले, असे फॉक्स न्यूजने प्रवाशाच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. ह्युस्टन पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेल्याचे वृत्त आहे. ताज्या वृत्तानुसार, महिलेविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @unlimited_ls या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “समाज खरोखरच बदलत चालला आहे. २०२० पूर्वी आपण अशा गोष्टी पाहिल्या नव्हत्या. वर्षातून एकदा किंवा दोनदा इंटरनेटवर अशा घटना घडताना आपल्याला दिसायच्या. पण आता असे दिसते की, दररोज काही ना काही वेडेपणा घडत आहे”. दुसऱ्याने, “व्हिडीओ शेअर करताना तिला ब्लर केल्याबद्दल खूप धन्यवाद”, अशी कमेंट केली.
दरम्यान, या घटनेनंतर, साउथवेस्ट एअरलाइन्सने KHOU ला सांगितले की, विमानातील ‘त्या’ महिला प्रवाशामुळे विमानाला गेटवर परत आणावे लागले. त्याबद्दल विमान कंपनीने माफीही मागितली.