कॅलिफोर्नियातील सॅन जोसमध्ये राहणाऱ्या सेलेना ऍवलॉस नावाच्या महिलेने डॉमिनोजमधून नेहमीप्रमाणे चिकन विंग्ज मागवले होते. मात्र ‘या’ चिकन विंग्जच्या बॉक्समध्ये तब्बल ५ हजार डॉलर असतील, याची त्यांना कल्पनादेखील नव्हती. सेरेना यांनी नेहमीप्रमाणेच डिलेव्हरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून चिकन विंग्जचा बॉक्स घेतला. त्यानंतर डॉमिनोजकडून आलेली ती व्यक्ती व्यक्ती निघून गेली.
चिकन विंग्स खाण्यासाठी बॉक्स उघडल्यावर ५ हजार अमेरिकन डॉलर्सची रक्कम सेरेना यांच्या दृष्टीस पडली. आज कालच्या जगात प्रामाणिकपणा तसा कमीच पाहायला मिळतो. सेरेना यांनी याच दुर्मिळ प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत डॉमिनोजशी संपर्क साधत त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. विशेष म्हणजे यामध्ये संपूर्ण चूक डॉमिनोजची असूनही सेरेनाच सर्वाधिक अस्वस्थ झाल्या होत्या.
‘ही रक्कम मी माझ्याकडे ठेवू शकत नाही, असेच मला वाटत होते. ती काही २० डॉलरसारखी छोटी रक्कम नव्हती. ते ५ हजार डॉलर होते’, अशी प्रतिक्रिया सेरेना यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. प्रामाणिकपणा हा नेहमीच चांगला असतो, असे मानणाऱ्या सेरेना यांनी संपूर्ण रक्कम डॉमिनोजकडे सुपूर्द केली. सेरेनाच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक सध्या सर्वत्र होते आहे. डॉमिनोजच्या रेस्टॉरंट व्यवस्थापकाने सेरेनाला वर्षभर पिझ्झा अगदी मोफत दिले जातील, अशी घोषणा केली आहे.
सेरेना यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना वर्षभर डॉमिनोजकडून मोफत पिझ्झा मिळणार आहे. शिवाय सेरेना यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून त्यांच्या कार्यालयाकडून त्यांना अधिक सुट्टीदेखील देण्यात आली. सेरेना यांची ही सुट्टी भरपगारी असणार आहे. सध्याच्या जगात प्रामाणिकपणा फारसा कुठेही पाहायला मिळत नाही. मात्र सेरेना यांनी याच दुर्मिळ प्रामाणिकपणाचे दर्शन घडवल्यामुळेच सध्या सगळीकडेच सेरेना यांचे कौतुक सुरू आहे.