Crime News : उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील एका सोसायटीत खेळणाऱ्या एका मुलाला महिलेने कारखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे या लहान मुलाला चिरडल्यानंतर ही महिला त्या मुलाला जखमी अवस्थेत सोडून तेथून पळून गेल्याचे पहायला मिळाले.

ही घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी शहरातील राज नगर एक्सटेंशनच्या एसजी ग्रँड सोसायटीमध्ये घडली. या दुर्घटनेत कारने साडेपाच वर्षांच्या एका मुलाला चिरडल्याची ही संपूर्ण घटना सोसायटीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या महिलेवर नागरिक सडकून टीका करत आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, एक होंडा सीटी कार सोसायटीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. पुढे ती कार रस्त्यावर खेळत असलेल्या लहान मुलाला चिरडते. कारचे पुढचे चाक या लहान मुलाच्या अंगावरून गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दुर्घटनेत मुलाला गंभीर इजा झाली असली तरी मुल बचावले आहे.

दरम्यान कार चालक महिलेची ओळख पटली असून तिचे नावा संध्या असे सांगितले जात आहे. मुलाच्या अंगावरून कार घातल्यानंतर ती काही वेळासाठी घटनास्थळी थांबल्याचे तसेच मुलाची विचारपूस करताना दिसून येते. मात्र त्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी ती घटना स्थळावरून पळून जाताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे काही काळासाठी दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी नंदग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली आहे, त्याच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड देखील तुटले असून त्याच्या उजव्या हातावर, डावा पाय आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर मुलाला वसुंधरा येथील अटलांटा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader