ऑनलाईन खरेदी हा सध्या वेगाने सुरु असलेला ट्रेंड आहे. त्यावर कधी, काय आणि कोणत्या किमतीला मिळेल याचा भरोसा नाही. आता हेच बघा ना, प्लास्टिकच्या बाटलीपासून तयार केलेली चप्पल अॅमेझॉनवर २० डॉलर म्हणजेच चक्क १४२३ रुपयांना विक्रीला ठेवण्यात आली आहे. आता ही चप्पल कोण विकत आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर न्यूझिलंडमधील एक महिला ऑनलाइन पद्धतीने ही चप्पल विकत आहे. आता टाकाऊपासून टिकाऊ म्हणून या चपलेचा प्रयोग ठिक आहे. पण म्हणून या चपलेची किंमत इतकी का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या किमतीमुळे ही चप्पल कोण विकत घेणार असा प्रश्न जरी उपस्थित झाला असला तरीही ऑनलाइन काहीही विकायला ठेवले जाऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

या बाटल्यांच्या चपलांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ही चप्पल एखाद्या स्लिपरप्रमाणे अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने बनवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘अॅमेझॉन इंडिया’वर नारळाच्या करवंट्या आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तू चक्क ५०० ते १५०० हजार रुपयांना विकल्या जात आहेत. नारळाच्या करंवटीपासून तयार केलेला कप चक्क तीन हजारांना विकला जात होता. या कपवर ५५ % सूट देऊन तो तब्बल १,३०० रुपयांना विकला जात असल्याची बाब या ट्विटर अकाऊंटवरून निदर्शनास आणून दिली. मग सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. मजा म्हणजे हे असे एकच उत्पादन नाहीये तर अशा अनेक वस्तू आहेत, ज्यात वाट्या, चमचे यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंची किंमत ही चारशे ते हजार रुपयांच्या घरात आहे.

Story img Loader