Woman sues Versace apartment developers : लंडनमधील एका अकाउंटट मी सुक पार्क यांनी व्हर्साचेने डिझाईन केलेल्या अपार्टमेंटच्या डेव्हलपर्स विरोधात १६.५ कोटी रुपयांचा (१.५ दशलक्ष पाऊंड) खटला दाखल केला आहे. हे अपार्टमेंट त्यांना सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे आलिशान नसल्याचा त्यांचा दावा आहे.
द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, नाइन एल्म्स येथील Aykon लंडन वन टॉवरमधील ५० मजली इमारतीमधील हे दोन बेडरूमचे अपार्टमेंट आणि पार्किंगची जागा यासाठी पार्क यांनी ४.२ कोटी रुपये (३८१,००० पाऊंड) डिपॉझिट म्हणून दिले आहेत. हे अपार्टमेंट फॅशन हाऊस व्हर्साचेच्या सहयोगातून विकसित करण्यात आले आहे.
निवृत्त होईपर्यंत हा फ्लॅट मुख्य घर म्हणून वापरण्याचा पार्क यांचा विचार होता, आणि हे घर विकत घेण्यासाठी त्यांनी त्यांचे आधीचे घर २०१९ मध्ये विकले होते. हे अपार्टमेंट २०२० रोजी पूर्ण होणार होते, पण बांधकामाला उशीर झाल्याने याचा ताबा मिळण्यासाठी २०२२ उजाडले. अखेर या घरात राहायला आल्यानंतर पार्क यांना दिसून आलं की एक बेडरूम अपेक्षेपेक्षा लहान आहे आणि दोनपैकी एका बाथरूममध्ये बाथ टब देण्यात आलेला नाही.
या प्रकरणी त्यांनी सेंट्रल लंडन काउंटी कोर्टात धाव घेतली आणि ७.७ कोटी रुपेय (७००,००० पाऊंड) नुकसान भरपाईची मागणी करणारा खटला दाखल केला. पार्क यांचे वकिल नाझर मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिपॉझीट देताना दाखवण्यात आलेल्या लेआऊटनुसार फ्लॅट भौतिकदृष्ट्या आणि अपेक्षेपेक्षा वेगळा होता.
डेव्हलपर्सच्या कंपनीने पार्क यांच्यावर त्यांनी फ्लॅटची खरेदी पूर्ण न केल्याचा आरोप करत खटल्याला उत्तर दिले. इतकेच नाही तर डेव्हलपर्सची बाजू मांडणारे वकिल रुपर्ट कोहेन यांनी ब्रोशरमध्ये दाखवलेले अपार्टमेंट हे फक्त उदाहरण होते आणि तो एक सामान्य लेआउट होता, असा युक्तीवाद केला. दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये अजूनही खटला सुरू आहे.