बाहेर गेले की कुठेही कचरा फेकणे ही अनेकांसाठी अतिशय सामान्य गोष्ट असते. कधी रस्त्याने जाताना, कधी ट्रेनमधून तर कधी बसमधून सहज कचरा फेकला जातो. असे करताना अनेकांना आपण रस्ता आणि पर्यायाने ते शहर खराब करत आहोत याची जाणीवही होत नाही. असाच हा कचरा वाढत जातो आणि शहरे बकाल रुप धारण करतात. पण कचरा टाकणाऱ्यांवर निर्बंध आणणे आवश्यक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हीने नुकतेच कारबाहेर कचरा फेकणाऱ्या एकाला चांगलेच बोल सुनावले होते. त्याचा व्हिडियोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर अशीच एक घटना घडली असून कारमधून कचरा बाहेर फेकणाऱ्या एका महिलेला बाईकस्वाराने चांगलाच धडा दिला आहे.

ही घटना चीनमधील बिजिंगमध्ये घडली असून त्याचाही व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका सिग्नलला कारमधील व्यक्ती कारची काच खाली करुन कचरा बाहेर टाकते. तेव्हा बाजूने बाईकवरुन जाणारा व्यक्ती सिग्नलला आपली बाईक थांबवतो. ती स्टँडवर लावतो आणि खाली उतरतो. इतकेच नाही तर कारमधून खाली टाकण्यात आलेला कचरा उचलतो आणि पुन्हा त्या कारमध्ये फेकतो. त्यानंतर हा व्यक्ती आपल्या मार्गाने निघूनही जातो. मग कारमधील महिला खाली उतरताही दिसत आहे. बाईकवरील या व्यक्तीकडे हात करत ती काहीशा रागात बोलत असल्याचेही व्हिडियोमध्ये दिसत आहे. CGTN या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडियो शेअर करण्यात आला असून त्याला ४८ हजार लोकांनी तो पाहिला आहे.