लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असते. पूर्वीच्या काळी वडीलधारी मंडळी मिळून लग्नाबाबत निर्णय घेत असत. त्यानंतर ओळखीच्या आत्या-मावश्यांकडून लग्न जुळवण्याचा काळ आला. यातून पुढे वधूवर सूचक मंडळ ही संकल्पना उदयास आली. २००० साल सुरु झाल्यानंतर देशामध्ये मॅट्रिमोनियल साईट सुरु झाल्या. या वेबसाइट्समुळे वयात आलेल्या मुलाला/ मुलीला मनपसंत जोडीदार निवडण्यासाठी अधिकची मदत मिळाली. सध्याच्या काळात बहुसंख्य लोक मॅट्रिमोनियल साईट्सच्या मदतीने विवाह जुळवण्याचा प्रयत्न करत असतात.
लग्न जुळवणे हे या वेबसाइट्सचे एकमेव ध्येय असते. पण एका महिलेने या माध्यमाचा वापर दुसऱ्याच कामासाठी केला आहे. लिंकडीन या करिअरशी संबंधित वेब पोर्टलवरील एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या अश्वीन बन्सल यांनी ही पोस्ट केली आहे. ३०,००० पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट लाइक केली आहे. अनेकांनी या पोस्टखाली कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल झालेली ही पोस्ट असंख्य यूजर्सनी शेअरदेखील केली आहे. बऱ्याच जणांनी याला जुगाड करण्याची नवी पद्धत असे म्हटले आहे.
अश्वीन बन्सल या पोस्टमध्ये म्हणतात, “माझ्या एका मैत्रिणीने जीवनसाथी डॉटकॉमवर प्रोफाइल तयार केले आहे. या वेबसाइटवर जाऊन ती वेगवेगळ्या लोकांचे पोफ्राइल्स चेक करत असते. यातून ती विविध कंपन्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या वेतनांसह अन्य सुविधांची माहिती मिळवते आणि त्यातील सर्वात उत्तम पर्याय असणाऱ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करते.” त्यांनी ही पोस्ट मागच्या आठवड्यामध्ये शेअर केली होती. या एकूण प्रकरणावरुन भारतीय कोणत्याही गोष्टीचा वापर आपल्या सोयीनुसार करु शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.