‘खळखळून हसणे हे कोणत्याही आजारावर सर्वोत्तम औषध आहे’, अशी म्हण आपण अनेकदा ऐकली आहे. तसेच काहीसे अमेरिकेतील एका महिलेबरोबर काहीशी चमत्कारिक घटना घडल्याची, माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका वृत्तावरून समजते. त्यानुसार अमेरिकेतील एक महिला तब्ब्ल पाच वर्षे कधीही बाहेर पडू न शकणाऱ्या [irreversible coma] कोमात होती. मात्र, ती अचानक हसत त्या कोमामधून बाहेर आली आहे. नेमके हे कसे घडले ते जाणून घेऊ.
२०१७ साली जेनिफर फ्लेवेलेन नावाच्या या महिलेच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर ती कधीही बाहेर पडू न शकणाऱ्या कोमामध्ये गेली असल्याचे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितले. मात्र, ऑगस्ट २०२२ रोजी जेनिफर तिची आई सांगत असलेल्या विनोदावर प्रतिक्रिया देण्यासाठी खदखदून हसत चक्क त्या कोमामधून बाहेर पडली.
हेही वाचा : Viral video : काय? प्रयोग म्हणून तरुण खातोय कच्चे चिकन! म्हणतो, “पोट दुखेपर्यंत…”
‘पीपल’ [People] नावाच्या एका पाश्चिमात्त्य वृत्तवाहिनीला माहिती देताना जेनिफरच्या आईने, पेगी जेनिफर कोमामधून बाहेर येताना तिला जाणवले आणि अनेक वर्षांनंतर तिच्या मुलीचा हसण्याचा आवाज ऐकून तिला प्रचंड भरून आले असे सांगते. “आज आमची सर्व स्वप्न, प्रार्थना पूर्ण झाल्या असे वाटते आहे. आमच्यामध्ये आणि जेनिफरमध्ये एक अदृश्य दरवाजा, भिंत असल्याचे जाणवत होते; मात्र आता ते दरवाजे उघडले आहेत आणि आम्ही पुन्हा एक झालो आहोत असे वाटते”, असेदेखील पेगीने ‘पीपल’ला सांगितल्याचे न्यूज १८ डॉट कॉमच्या वृत्तावरून समजते.
अजूनही जेनिफर पूर्णतः बरी झाली नाहीये. मात्र, मान हलवून उत्तरे देणे म्हणजे प्रगतीची नक्कीच आशा आहे, असे पेगीचे म्हणणे होते. त्यानुसार जेनिफरच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली असून, २०२३ मध्ये ती तिच्या भावाची फुटबॉल मॅच पाहण्यासाठीही गेली होती.
“जेनिफरचे फिजिशियन डॉक्टर रॅल्फ वांग यांनी जेनिफरची ही प्रगती फारच विलक्षण आणि असामान्य असल्याचे म्हटले आहे. यासाठी तिने अधिक थेरपी आणि स्वतःची प्रकृती भरभर सुधारण्यासाठी प्रचंड मेहेनतदेखील घेतली आहे. या सर्व उपचारांसाठी ‘गो फंड मी’ [Go fund me] नावाची संस्था पैसे गोळा करत आहे”, अशी माहिती @pubity नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झाली आहे.
मात्र, यावर नेटकऱ्यांना हा चमत्कार घडवणारा विनोद नेमका कोणता होता हे जाणून घेण्याची उत्सुकता असल्याचे त्यांनी पोस्टखाली केलेल्या प्रतिक्रियांमधून समजते.
“हा चमत्कार घडवणारा विनोद कोणता होता? मला खरंच ऐकायचा आहे” असे एकाने म्हटले आहे. दुसऱ्याने, “हसणे खरंच एक सर्वोत्तम औषध आहे” असे लिहिले आहे.