मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या असाच एक एसी लोकलमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलांमध्ये बसण्याच्या जागेवरुन जोरदार भांडणं सुरु आहेत, दरम्यान या व्हिडीओमधील लक्षवेधी बाब म्हणजे ही भांडणं एसी लोकलमध्ये सुरू आहेत. मुंबईत एसी ट्रेनचं तिकिट सामान्य लोकलच्या तुलनेत १० पट महाग आहे. त्यामुळे या ट्रेननं आर्थिकदृष्ट्या सधन लोकच प्रवास करतात. बरं, सधन मंडळी ही तुलनेत शांत असतात उगाचच भांडणं करत नाहीत असा एक समज आहे. पण या महिलांची भांडणं पाहिल्यानंतर मात्र सामान्य लोकल ट्रेनच्या हाणामारी परवडल्या असं म्हणायची वेळ येईल. कारण एक महिला जागा मिळाली नाही म्हणून चक्क जबरदस्तीनं दुसऱ्या महिलेच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करतेय. अन् ती महिला तिला अक्षरश: ढकलून पाडतेय. बरं त्यांची भांडणं जरी इंग्रजीमध्ये सुरू असली तरी त्यांचा आवेश मात्र देसीच आहे.
पाहा व्हिडीओ
दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. मुंबई लोकलमध्ये अशा घटना घडण्याच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे.