Trending News Today: जर तुमच्या दाराचा रंग बदलला नाही तर २० हजार पाउंड म्हणजेच जवळपास १९ लाखाचा मोठा दंड आकारण्यात येईल अशी विचित्र नोटीस एका महिलेला धाडण्यात आली आहे. मिरांडा डिकिन्सन असे या महिलेचे नाव असून तिने आपल्या घराचा मुख्य दरवाजा गुलाबी रंगाने रंगवल्याने हा भलताच वाद सुरु झाला आहे. अलीकडेच मिरांडा यांनी आपल्या घराचे नूतनीकरण केले ज्यामध्ये रंगकाम करून घराचा मुख्य दरवाजा गुलाबी रंगाने रंगवण्यात आला. मात्र आता लवकरात लवकर हा रंग बदलण्यासाठी मिरांडाला नोटीस धाडण्यात आली आहे. नोटिशीनुसार रंग न बदलल्यास डिकिन्सन कुटुंबाला १९ लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
स्कॉटलँड, एडिनबर्ग मधील या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ४८ वर्षीय मिरांडा यांनी २०१९ मध्ये आपल्या पालकांचे घर विकत घेतले. या घराचा मुख्य दरवाजा हा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असल्याचे मिरांडा सांगतात. अनेकजण फोटो काढण्यासाठी, इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी याच दरवाज्यासमोर येऊन थांबतात. म्हणूनच यंदा घराचं काम करताना मिरांडा यांनी हा दरवाजा खास गुलाबी रंगानी रंगवून घेतला. पण मिरांडा यांच्या या निर्णयाने एडिनबर्ग सिटी काउंसिलला काही आवडलेला नाही.
प्राप्त माहितीनुसार, एडिनबर्ग सिटी काउंसिलने मिरांडा यांना नोटीस पाठवून सांगितले की, “मिरांडा यांनी घराच्या दरवाज्याला दिलेला रंग हा सदर इमारतीचे ऐतिहासिक मूल्य कमी करत आहे.”तर दुसरीकडे मिरांडा यांनी काउंसिलच्या या निर्णयाला द्वेषयुक्त व संकुचित म्हंटले आहे.
“ब्रिटनमधील ब्रिस्टल, नॉटिंग हिल आणि हॅरोगेट सारख्या शहरांमध्ये घरांचे रंग असेच आहेत, जेव्हा माझ्या घराचा दरवाजा पाहून सर्वजण थांबतात तेव्हा मला आनंद होतो व अभिमान वाटतो” असेही मिरांडा यांनी म्हंटले आहे. काउंसिलने मिरांडा यांना घराचा दरवाजा पांढऱ्या रंगात बदलण्यास सांगितले होते मात्र हे हास्यस्पद आहे असे म्हणत आता मिरांडा यांनी दरवाजा गडद लाल रंगात रंगवण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, मिरांडा यांचे घर एडिनबर्गच्या न्यू टाऊनच्या जागतिक वारसा संवर्धन क्षेत्रात आहे. याचा अर्थ परिसरातील मालमत्तांमध्ये कोणते बदल केले जावेत हे निर्णय नियमाच्या अधीन आहेत. एडिनबर्गच्या जुन्या आणि नवीन शहरांना १९५५ मध्ये युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे.