Women Giving Birth to 9 Babies Reality: सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने नऊ बाळांना जन्म दिल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये महिलेचा प्रसुतीपूर्व स्थितीतील असल्याचे सांगत एक फोटो सुद्धा शेअर करण्यात येत आहे. ही क्लिप शेअर करणाऱ्यांनी दावा केला आहे की त्यावेळेस महिलेच्या पोटात नऊ अर्भकं होती. व्हिडिओमध्ये तिला प्रथम रुग्णालयात नेतानाचे व नंतर नवजात बाळांना एका रांगेत दाखवून शेजारी महिलेच्या मोठ्या पोटाचे फोटो लावण्यात आले होते, दरम्यान इंडिया टुडेने या संदर्भात केलेल्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आल्याचे समजत आहे.

काय होत आहे व्हायरल?

एका व्यक्तीने X वर व्हिडिओ शेअर केला होता की, “9 महिन्यांपासून 9 बाळांसह जगणे! आई जगातील सर्वात महान जीव आहे. पण या बाळांचा बाबा आनंदाने रडत आहे की दुःखाने हे कळत नाहीये.”

तपास

इंडिया टुडेच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, व्हायरल व्हिडिओमधील कीफ्रेम्सचा शोध घेतल्यावर याच महिलेचा फोटो असणाऱ्या काही बातम्या समोर येतात. यामध्ये, सदर महिला ही चीनच्या हुआंग गुओक्सियान भागातील असून ती दोन मुलांची आई आहे आणि तिचे पोट दोन वर्षांपासून आजारी वैद्यकीय स्थितीमुळे वाढले होते असे सांगण्यात आले होते. या महिलेला ‘ओव्हेरियन कर्करोग’ आणि ‘लिव्हर सिरोसिस’सह अनेक रोगांचे निदान झाले.

ऑक्टोबर २०२० मध्ये या महिलेबद्दल आणखी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यात म्हटले होते की, या चीनी महिलेची शस्त्रक्रिया झाली आहे. या महिलेच्या पोटात कर्करोगामुळे द्रव आणि ट्युमर (गाठी) एकत्र येऊन तब्बल ४० किलोचा गोळा तयार झाला होता. यामुळे या महिलेचे पोट फुगले होते.

चीनमधील अंशुन जवळील सोंगकी टाउनच्या दाझी गावात राहणारी ही महिला शेतीची कामे करते, तिला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्य आहेत. २०१८ पर्यंत तिचे पोट सपाट होते पण पुढील दोन वर्षात चाळीस किलोचा गोळा तयार असून तिचे शरीर अवाढव्य झाले. स्थानिक माध्यमांद्वारे मदतीची याचना केल्यानंतर २०२० मध्ये तिच्या उपचारासाठी देणग्या देण्यात आल्या.

साधारण या देणग्यांमधून ११ लाखांपेक्षा जास्त रुपये जमा झाल्यावर तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. देणगीतील उर्वरित रक्कम तिने नंतर एक छोटा व्यवसाय सुरु करण्यासाठी वापरली.

दुसरीकडे व्हायरल व्हिडिओमध्ये नवजात बालकांचे जे फोटो आहेत ते बहुधा एडिट करुन नंतर जोडण्यात आले असावेत कारण याचा संदर्भ सदर महिलेच्या बातम्यांमध्ये आढळून आला नाही.

निष्कर्ष: चीनमधील महिलेने नऊ बाळांना जन्म दिलेला नाही. तिच्या पोटाचा मोठा आकार हा कर्करोगामुळे झाला होता.

Story img Loader