सोशल मीडियावर अनेक चित्र-विचित्र पदार्थ आणि त्यांचे केलेले कॉम्बिनेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. ‘फ्युजन फूड’चे असे अनेक तऱ्हेवाईक व्हिडीओ व्हायरल होत असतात. दोन चांगल्या पदार्थांना एकत्र करून, त्यापासून विचारदेखील सहन होऊ न शकणारे असे काहीतरी बनवून लोकांना खायला घालायचे ‘फॅड’ सध्या आपल्या अवतीभवती पाहायला, वाचायला वा ऐकायला मिळतेय. त्यामध्ये उदाहरण द्यायचे झाले तर, ताक पास्ता, चॉकलेट भात, पार्लेजी ऑम्लेट असे अनेक किळसवाणे वाटणारे पदार्थ आहेत.
मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती म्हणजे ‘तंदुरी चिकन केक’ची. आता हे नाव वाचून स्वाभाविकत: अनेकांच्या अंगावर सरसरून काटा आला असेल. कारण- चिकन आणि केक हे एकत्र आणलेला पदार्थ चवीला कसा लागू शकतो याचा विचारही आपल्याला कदाचित शिसारी आणू शकतो. मात्र, व्हायरल होणारा हा तंदुरी चिकन केक एक ‘रियालिस्टिक केक’ आहे आणि आजकाल अशा प्रकारच्या केकना वाढती मागणी आहे. रियालिस्टिक केक हा कोणत्याही वस्तूचा वा कल्पनात्मक चित्र-विचित्र आकार देऊन, त्याला अगदी हुबेहूब त्या गोष्टीसारखे बनवायचे असते. त्याला आपण खरे तर ‘आभासी केक’ म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
हेही वाचा : बाईकवर बसलेल्या या काकूंचे साडीप्रेम बघून तुम्हीही खळखळून हसाल! पाहा हा मजेशीर Video
अजून सोपे करून सांगायचे झाले, तर या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचे उदाहरण घेऊ. व्हिडीओमध्ये एक लाल रंगाचे तंदुरी चिकन आपल्याला पाहायला मिळते. वरून ते चिकन छान खरपूस भाजले असल्याचेही आपण पाहू शकतो. अशा या पाहूनच चविष्ट वाटणाऱ्या तंदुरी चिकनच्या तुकड्याकडे पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटेल. मात्र, इतका खरा दिसणारा हा चिकनचा तुकडा सुरीने चिरल्यावर मात्र तो केक असल्याचे आपल्याला समजते. म्हणजेच केकला दिलेल्या रंगांनी, आकाराने तो केक आपल्याला तंदुरी चिकनचा आभास निर्माण करून देत आहे. अशा केकना ‘हायपर रियालिस्टिक केक’ असेही म्हणतात.
खरेच अशा पद्धतीचे हुबेहूब एखादा पदार्थ बनविण्यासाठी व्यक्तीकडे किती कौशल्य लागते, हे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून अगदी स्पष्टपणे दिसते. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @diyacakesit नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरी काय म्हणतात ते पाहा.
हेही वाचा : ‘या’ देशात चक्क ‘रोबोट्स’ करतात फूड डिलिव्हरी! पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video
“पण हा केक व्हेज आहे ना?” अशी एकाने मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. “कमाल! खरंच असा केक बनवणं खरंच खूप कौशल्याचं काम आहे”, असे दुसऱ्याने लिहिले. “बापरे…. हे तंदुरी चिकन नसून, केक आहे!! खूपच भारी!”, असे तिसऱ्याने म्हटले आहे.
व्हायरल होणाऱ्या या रियलिस्टिक तंदुरी चिकन केक व्हिडीओला आतापर्यंत ७.६ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.