‘विमेन आर फ्राॅम व्हीनस अँड मेन आर फ्राॅम मार्स’ असं म्हणतात. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात मंगळ ग्रह युध्दाची देवता मानली जाते. त्यामुळे ते योध्यांचं आणि पर्यायाने पुरूषांचं प्रतीक मानलं जातं. तर व्हीनस देवता स्त्रीत्वाचं प्रतीक मानलं जातं. एका अर्थाने स्त्री-पुरूषांच्या पारंपारिक सामाजिक भूमिकांची आठवण करून देणारी ही पुराणकाळातली उदाहरणं आहेत.
पण भारताच्या महिला शास्त्रज्ञांनी आता मंगळावर चढाई करण्यासोबतच भारताच्या अनेक अंतराळ मोहिमांना महत्त्वाचा हातभार लावला आहे.
कालच भारताने एकाच वेळेला १०४ सॅटेलाईट एकत्र आकाशात सोडण्याची किमया करून दाखवली. अनेक पाश्चात्त्य देशांनी वर्षनुवर्ष अत्याधुनिक तंत्रज्ञान देणं नाकारल्यावरही स्वत:च्या बळावर हे तंत्रज्ञान विकसित करत भारताने आतापर्यंत अवकाश संशोधनात भरारी मारली आहे. यात इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन म्हणजेच ‘इस्रो’चा मोठा हात आहे.
इस्रो मध्ये अनेक मोठ्या पदांवर महिला संशोधक कार्यरत आहेत.
अनुराधा टी.के. या इस्रोमध्ये काम करणाऱ्या या सर्वात उच्चपदस्थ महिला आहेत. इस्रोच्या जिओसॅट प्रोग्रॅमच्या त्या डायरेक्टर आहेत. त्यांच्या मते भारतातल्या स्त्रिया आता पारंपारिकतेचं जोखड फेकत बऱ्याच प्रमाणात पुढे येत आहेत. पण अजूनही बऱ्याच प्रमाणात त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडून संसारातल्या त्याच त्या भूमिकांची अपेक्षा करत राहतात.
“जेव्हा नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. तेव्हा आमच्या गावात टीव्हीही नव्हता. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याची बातमी मी रेडिओवर एेकली. ही बातमी एेकून मी एवढी प्रभावित झाले की त्या बातमीवर मी माझी मातृभाषा कन्नडमध्ये कविता केली होती.” त्यांनी बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.
अनुराधांसारख्या अनेक महिला शास्त्रज्ञ इस्रोच्या अनेक मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
“आम्ही अनेकदा १०-१२ तास काम करतो” मार्स आॅरबिटर मिशनच्या डेप्युटी डायरेक्टर नंदिनी हरिनाथ यांनी बीबीसीला प्रतिक्रिया दिली “एखाद्या मिशनची लाँच डेट जवळ आली असेल तर आम्ही १२-१४ तासही आॅफिसमध्ये असतो” त्या म्हणाल्या.
वाचा- उकळत्या तेलात ‘तो’ चक्क हातांनी तळतो भजी
भारतासारख्या देशात जिथे महिलांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यापासून रोखणारी अनेक सामाजिक कारणं आहेत. त्यातूनही मार्ग काढत भारताच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या या महिलांना सलाम!