८ मार्चच्या जागतिक दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी एक अभिनव कँपेनने जनजागृती सुरू केलीये. इजिप्तमधल्या वर्तमानपत्रांमध्ये संयुक्त राष्ट्रांनी एक वेगळीच जाहिरात मोहीम राबवली आहे.

तिथल्या पेपर्समध्ये संयुक्त राष्ट्रांनी तीन चित्रं छापली आहेत. ‘या चित्रांमध्ये महिला कुठे आहेत?’ अशा शीर्षकाखाली त्यांनी ही चित्रं छापली आहेत.

या चित्रात महिला दिसत आहेत का?
या चित्रात महिला दिसत आहेत का?

 

या चित्रांमध्ये मुंग्यांसारखी माणसं दिसत आहेत. ही माणसं पुसटशी ओळखू येत असली त्यातला बहुतांशी पुरूषवर्ग आहे हे लगेच लक्षात येतंय. अशा परिस्थितीत या चित्रांमध्ये महिला कोण आहे हे समजतच नाही.

पण याच चित्रांमधून संयुक्त राष्ट्रांनी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली आहे. इजिप्तमध्ये आणि इतर अरब देशांमध्ये महिलांचा सार्वजनिक जीवनातला सहभाग अतिशय थोडा आहे. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिध्द केलेल्या या चित्रांमध्ये महिला नाहीतच असं नाही. पण त्यांना शोधायला बरेच प्रयत्न करावे लागतात यावरूनच महिलांना मिळणाऱ्या कमी संधींची बाब अधोरेखित होते. संयुक्त राष्ट्रांनी वरच्या दोन चित्रांव्यतिरिक्त आणखी दोन चित्रं प्रसिध्द केली आहेत.

राजकारणातही महिलांचा सहभाग कमी
राजकारणातही महिलांचा सहभाग कमी

 

संशोधनाचं क्षेत्रही 'पुरूषी'?
संशोधनाचं क्षेत्रही ‘पुरूषी’?

 

हे प्रत्येक चित्रं इजिप्तमधली तीन क्षेत्रं दाखवतं. टेक्नाॅलाॅजी, संशोधन आणि राजकारण. या तिन्ही क्षेत्रांत स्त्रियांची संख्या नगण्य आहे. तसंच या चित्रांमध्ये उजव्या बाजूला खाली जर आपण पाहिलं तर ‘व्यावसाय़िक क्षेत्रात स्त्रिया एवढ्या कमी प्रमाणात कशा असू शकतात?’ अशा आशयाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांनी विचारला आहे.

आपल्याकडेही काहीशी अशीच परिस्थिती असली तरी ती पश्चिम आशियातल्या अरब देशांएवढी भीषण नक्कीच नाही. खालचा फोटो पहा

सौदी अरेबियामधली 'महिला हक्क परिषद', परिषदेत एकही महिला नाही!
सौदी अरेबियामधली ‘महिला हक्क परिषद’, परिषदेत एकही महिला नाही!

 

ही आहे सौदी अरेबियामध्ये ‘महिला हक्क परिषद’, आणि या परिषदेमध्ये एकही महिला नव्हती! सौदी अरेबियातल्या राजकारणातले यच्चयावत पुरूष ‘महिलांच्या हक्कांविषयी’ चर्चा करणार होते. यावर जगभरातून टीका झाली होती.

बाकी लोकशाही आणि मुक्त विचारांची भूमी म्हणवल्या जाणाऱ्या देशांमध्येही अलीकडे काही वेगळी परिस्थिती नाहीये. या देशाच्या अध्यक्षांनी स्त्रियांच्या गर्भपातविषयक निर्णय घेण्याच्या हक्कांवर गदा येईल अशा स्वरूपाच्या एका वटहुकूमावर स्वाक्षरी केली होती. पाहा फोटो

गर्भपातावर बंधनं आणणारा वटहुकूम मंजूर करणारे डोनाल्ड ट्रम्प, फोटोत सगळे 'पुरूष'च
गर्भपातावर बंधनं आणणारा वटहुकूम मंजूर करणारे डोनाल्ड ट्रम्प, फोटोत सगळे ‘पुरूष’च

 

स्त्रियांनी त्यांच्या शरीराबाबतच्या प्रश्नांवर काय निर्णय घ्यावा यासंदर्भातल्या या वटहुकुमावर सही करताना अध्यक्षमहाराजांभोवती एकही महिला नव्हती! यावरूनही अर्थात डोनाल्ड ट्रम्पवर टीका झाली होती.

८ मार्चचा महिला दिनाचा लढा याच मानसिकतेविरोधात आहे. ‘महिलामुक्ती वाल्या’, किंवा ‘तो तर काय बायकोच्या ताटाखालचं मांजर’ अशा स्वरूपाच्या कमेंट्स करणाऱ्या स्त्री-पुरूषांनी ही बाब मनात बिंबवत या जागतिक लढयाला पाठिंबा दिला पाहिजे.

Story img Loader