असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपल्या कामानं मेहनतीनं आपला ठसा उमटवला नसेल. ही आजच्या काळातली स्त्री आहे तिनं जिद्दीनं प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ केलं आहे. ‘जागतिक महिला दिना’निमित्त विविध क्षेत्रात आपल्या कतृत्त्वानं ठसा उमटवणाऱ्या अनेक महिलांच्या यशोगाथा तुम्ही वाचल्या असतील पण आज आपण भेटणार आहोत अशा दोन महिलांना ज्या तुमच्या आमच्यासारख्याच सामान्य आहेत मात्र इतरांपेक्षा वेगळी वाट निवडून त्यांनी आपल्या घरची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.

आतापर्यंत वस्तू, खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉईज मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी अधिक पाहायला मिळते. मात्र २२ वर्षांची प्रियांका आणि वयाची चाळीशी उलटलेल्या सूवर्णानं पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत डिलिव्हिरी वुमनंच काम स्वीकारलं. स्वीगी अॅपसाठी त्या डिलिव्हरी वुमनचं काम पाहतात. स्वीगीसाठी हजारो डिलिव्हिरी बॉईज देशाच्या विविध शहरांत काम करतात मात्र त्यात प्रियांका थोरात आणि सूवर्णा ब्रीदनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सूवर्णा या स्वीगीच्या पहिल्या डिलिव्हरी वुमन आहेत. स्वीगीत डिलिव्हिरी वुमनची नोकरी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं तेव्हा एकही महिला हे काम करत नव्हती.

डिलिव्हरी बॉइज म्हणून काम करायला काय हरकत आहे या विचारानं सुवर्णानं कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. आतापर्यंत कोणत्याही महिलेनं डिलिव्हरी बॉईज या पदासाठी अर्ज केला नव्हता. सुवर्णाला डिलिव्हरी वुमन म्हणून काम करण्याची संधी कंपनीनं दिली. आज मुंबईत २० हून अधिक महिला डिलिव्हरी वुमन म्हणून काम करत आहेत. या प्रत्येकासाठी सुवर्णा प्रेरणादायी ठरत आहेत. मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतंही काम छोटं मोठं नसतं असं त्या म्हणतात. घर मुलं आणि आई-वडिलांना सांभाळून त्या पूर्णदिवस मुंबईतल्या विविध भागात पदार्थांची डिलिव्हरी देण्याचं काम करतात.

सूवर्णाप्रमाणे २२ वर्षीय प्रियांका थोरातही कंपनीसाठी डिलिव्हरी वुमनचं काम पाहते. तिनं पालक कोवळ्या वयातच गमावले. एका धाकट्या बहिणीसह चार भावंडांची जबाबदारी असलेली प्रियांका आज डिलिव्हरी वुमनचं काम पाहत घरची जबाबदारी सांभाळते. प्रियांका फॅशन डिझायनर बनवण्याचे स्वप्न असलेल्या बहिणीच्या शिक्षणासाठी पैसे साठवते आहे. स्वीगीसाठी काम करणारी ती दुसरी डिलिव्हरी वुमन आहे.

प्रियांका- सूवर्णा या दोघींनांही या कामातून आनंद मिळतो. ग्राहकांकडे डिलिव्हरी पोहोचवताना खूप चांगले अनुभव येतात अनेकदा महिला डिलिव्हरी वुमन पाहून ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसतो. पण ते आमच्या कामाचं कौतुक करतात. आतापर्यंत जिथे गेलो तिथे ग्राहकांकडून कौतुकाची थापच पाठीवर पडली असंही दोघी सांगतात.

या दोघींसाठी सेफ झोनही कंपनीनं आखून दिला आहे. त्यामुळे सकाळ ते सायंकाळ अशा ठराविक वेळातच या दोघी काम करतात. इतर गरजू महिलांनी या क्षेत्रात पाऊल ठेवावं असंही त्या दोघी सांगतात.

Story img Loader