भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सकाळपासूनच ट्विटर, सोशल मीडियावर मोदींवर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. मोंदीचे चाहते आणि भाजपाचे कार्यकर्ते आपापल्या परिने वाढदिवस साजरा करत आहेत. कोणी मोठे फलक लावले आहेत तर कोणी किना-यावर वाळूंपासून मोदींचे शिल्प बनवले. तर अनेकांनी आपापल्या स्टाईलमध्ये मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
सुरतमधल्या एका बेकरीमध्ये तर मोदी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त एक दोन किलो नाही तर तब्बल ३ हजार ७५० किलोंचा केक बनवला आहे. हा केक कदाचित विश्वविक्रमही मोडू शकतो असा दावा या बेकरीने केला आहे. या केकची गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद होण्याची शक्यता आहे.
पिरॅमिडच्या आकाराचा हा केक आहे. ७ फूट उंच असा हा केक असून ३० शेफने मिळून तो बनवला आहे. भारताच्या विविध भागातील आदिवासी पाड्यातून आलेल्या मुली मिळून हा केक कापणार आहेत. मोदींनी महिला सबलीकरणासाठी जे पाऊल उचलले त्याचप्रमाणे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यांसारख्या मोहिम राबवल्या आहेत त्यामुळे या सन्मानार्थ हा केक बनवल्याचे समजते आहे. जवळपास ५००० मुली एकत्र येऊन आज हा केक कापणार असल्याचे समजते. हा केक विश्वविक्रम साकारले अशी आशा बेकरीने केली आहे. याआधी जगातील सगळ्यात मोठा पिरॅमिड केक पोलंडमध्ये तयार करण्यात आला होता. २०११ मध्ये तयार करण्यात आलेल्या या केकचे वजन सातशे किलोहून अधिक होते.