मच्छिमारांना अनेकदा मासेमारी करायला गेल्यावर हाती काहीच लागत नाही. तर कधी मोठे मासे, वेगळ्या प्रकारचे दगड, खनिज किंवा मौल्यवान रत्नेही त्यांच्या जाळ्यात अडकतात. असे काही सापडले की त्या किनाऱ्यावर ती वस्तू किंवा तो प्राणी पाहण्यासाठी मोठी गर्दीही होते. समुद्राच्या पोटात अतिशय मौल्यवान गोष्टी दडल्या असल्याचे यानिमित्ताने आपल्यासमोर येते.
फिलिपिन्समधील पालवन बेटावर राहणाऱ्या एका मच्छिमाराच्या हाती असाच एक वेगळ्या प्रकारचा दगड लागला. आता दगड म्हटल्यावर त्याचे काय कौतुक. वेगळा वाटल्याने तो मच्छिमार हा दगड घेऊन आपल्या घरी गेला आणि त्याने शोभेची वस्तू म्हणून तो ठेवलाही. पण काही वर्षांनंतर त्याने त्याबाबत शोध घेण्याचे ठरवले आणि त्या दगडाचे मूल्य त्याच्या लक्षात आले. विशेष म्हणजे या दगडामुळे हा मच्छिमार चक्क अब्जाधीशही झाला.
हा मच्छिमार मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेला होता. तो मासे पकडत असताना अचानक वादळ आले. त्या वादळात तो अडकला. वादळाचा जोर वाढल्याने त्याने जीव वाचवण्यासाठी एका दगडाचा आधार घेतला. काही काळाने वादळ थांबल्यानंतर हा मच्छिमार सहीसलामत परतला. परंतु, ज्या दगडामुळे आपला जीव वाचला त्याला भाग्यवान समजून मच्छिमार तो दगड आपल्या घरी घेऊन गेला.
सुमारे दहा वर्षे हा दगड त्या मच्छिमाराने आपल्या घरी ठेवला. मात्र, एके दिवशी अचानक त्याच्या घराला आग लागली. त्यानंतर एक पर्यटन अधिकारी तेथे आला असताना त्याची नजर त्या दगडावर पडली. त्याने या दगडाविषयी मच्छिमाराकडे विचारणा केली. तेव्हा मच्छिमाराने सारी हकीकत सांगितली. मच्छिमाराचे म्हणणे ऐकल्यानंतर हा साधासुधा दगड नसून एक विशाल मोती असल्याचे त्या पर्यटन अधिकाऱ्याने सांगितले. ते ऐकताच मच्छिमाराला आश्चर्याचा धक्का बसला. हा मोती विक्रीसाठी ठेवला असता त्याला तब्बल ६ अब्ज ५३ कोटी इतकी प्रचंड किंमत मिळाली. त्यामुळे हा गरीब मच्छिमार अक्षरशः एका रात्रीत अब्जाधीश झाला.