जगभरात आपल्याला वेगवेगळ्या अजब वस्तू बघायला मिळतात. भारतातही अशा अजब वस्तू आहेत. ज्यांच्याबाबत खूप कमी लोकांना माहिती असेल. प्रत्येक घरात उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाण्यासाठी मातीचा माठ ठेवला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, जगातील सर्वात मोठा माठ कुठे आहे? मातीचा माठ टाकीइतका असू शकतो का? ऐकून आश्चर्य नका होऊ, कारण हे खरंय. जगातील सर्वात मोठा आणि जुना माठ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
जगातील सर्वात मोठा आणि जुना माठ उत्तर प्रदेशमधल्या कन्नौजमध्ये ठेवण्यात आला आहे. ‘सुगंध’साठी प्रसिद्ध असलेल्या इत्रानगरीच्या संग्रहालयात जतन केलेल्या या मातीच्या माठात चक्क दोन हजार लिटर पाणी साठवता येतंय. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी, कुशाण वंशाचे हे भांडे ४० वर्षांपूर्वी कन्नौज शहरातील शेखपुरा परिसरात उत्खननात सापडले होते.
सम्राट हर्षवर्धन आणि राजा जयचंद यांचं साम्राज्य असलेल्या या जिल्ह्याचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. इथे वेळोवेळी केलेल्या उत्खननात अशा अनेक अनोख्या गोष्टी समोर आल्या आहेत. हे भांडे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकातील कुशाण राजवटीत सर्वात मोठे भांडे आहे. नव्याने बांधलेल्या संग्रहालयात काचेच्या वर्तुळात जतन केलेला हा प्राचीन वारसाचा व्हायरल फोटो पाहून लोक अचंबित होत आहेत. . या माठाची रुंदी ४.५ फूट असून उंची ५.४ फूट आहे.
इ.स.पूर्व १५०० पूर्व काळातील भांडी
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कनिष्कच्या राजवटीत ४० हून अधिक लहान-मोठी भांडीच नव्हे, तर त्यापूर्वी आणि त्यानंतर गुप्त काळात वापरण्यात आलेली भांडीही येथे उत्खननात सापडली आहेत. कुशाण राजघराण्याआधी म्हणजेच इ.स.पूर्व १५०० पूर्वीही येथे भांड्यांचे अवशेष सापडले आहेत. कन्नौजमध्ये पेंटेड ग्रे वेअर आणि नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेअर कल्चर होते असे पुरातत्व संशोधनातून दिसून येते. त्यामुळे ३५०० वर्षांपूर्वीही येथे मानवी सभ्यता अस्तित्वात होती हे स्पष्ट होते.
आणखी वाचा : राहुल द्रविडच्या साधेपणावर फिदा झाले फॅन्स, बुक लॉंचच्या कार्यक्रमात शेवटच्या रांगेत बसलेला फोटो VIRAL
इतिहास तज्ञ आणि राज्य वस्तुसंग्रहालयाचे अध्यक्ष दीपक कुमार सांगतात की, यापेक्षा मोठा आणि जुना माठ आजपर्यंत कुठेही सापडलेला नाही. बऱ्याच संशोधनानंतरच या माठाच्या वयाचा अंदाज लावता आला. हे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कुशाण राजवटीत ७८ ते २३० इसवी सन दरम्यानचे आहे. तेव्हा गंगा नदी शहराजवळून जात असे. त्यावेळी अशा माठांमध्ये पाणी भरून ठेवण्याची परंपरा होती.
कन्नौजमध्ये पाच दशकांहून अधिक काळ पुरातत्व विभागाच्या उत्खननात अनेक अनोख्या गोष्टी समोर आल्या आहेत. टेराकोटाची शिल्पे असोत किंवा हजार वर्षांहून अधिक जुने चलन असो. भगवान शंकराच्या विविध मुद्रांमधील प्राचीन मूर्तीही येथून सापडल्या आहेत. विविध शतकांतील शिलालेख, शिल्पे, नाणी, भांडी, दगडही येथे येत आहेत. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माशी संबंधित अनेक वारसा येथे जतन करण्यात आले आहेत. कार्बन डेटिंग आणि थर्मोल्युमिनेसन्स पद्धतींद्वारे सर्वांच्या वयोगटांचा अंदाज लावला गेला आहे.