‘मँडरीन डक’ हे जगातील सर्वात सुंदर बदक म्हणून ओळखलं जातं. सर्वात सुंदर पक्ष्याच्या यादीत या बदकाचा समावेश आहे. या बदाकाची गडद जांभळी, मोरपंखी, केशरी तपकिरी रंगाची पिसं पाहणाऱ्याला मोहून टाकतात. नर मँडरीन बदक हे दिसायला मादीपेक्षाही आकर्षक असतं. हे बदक आशिया खंडात आढळतं, मात्र गेल्याकाही दिवसांपासून न्यूयॉर्कमधल्या सेंट्रल पार्कमध्ये या ‘मँडरीन डक’चं वास्तव्य असल्यानं पक्षीप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झालंय.
यापूर्वी कधीही अमेरिकेत या पक्ष्याचं आगमन झालं नव्हतं. तेव्हा हजारो किलोमीटरचं अंतर पार करून हा पक्षी येथे पोहोचला कसा याचं उत्तर अनेकांना सापडत नाही. प्रामुख्यानं जपान, चीनमध्ये हे बदक आढळतं. हे बदक सुंदर दिसतं त्यामुळे चीनमध्ये १९७५ पर्यंत या पक्ष्यांची विक्री होत असे अखेर या देशानं पक्ष्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली.
यापूर्वी कधीही या पक्ष्याला अमेरिकेत पाहिलं गेलं नव्हतं. त्यामुळे न्यूयॉर्कमधल्या सेंट्रल पार्कमध्ये या नव्या पाहुण्याला बघण्यासाठी पक्षीप्रेमींची अक्षरश: रिघ लागली आहे. न्यूयॉर्कमध्ये हा पक्षी आला कसा याचं उत्तर कोणाकडेच नाही. मात्र या पक्ष्याची प्रकृती उत्तम आहे तसेच इथल्या वातावरणाशी त्यानं जुळवून घेतलं आहे. तो इथल्या वास्तव्याचा आनंद घेत आहे त्यामुळे त्याला पकडण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही अशी माहिती इथल्या वनधिकाऱ्यानं दिली आहे.