उत्तर प्रदेशातील बांदा येथील एका अल्पवयीन मुलाविरुद्ध २००८ मध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये तिने एका मुलाने तिच्या अल्पवयीन मुलीला अश्लील पत्र लिहून तिचा विनयभंग केल्याचं तक्रारीत लिहिलं होतं. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. दरम्यान, मागील १५ वर्षांत या खटल्याच्या अनेक तारखा पडल्या अनेक न्यायाधीश बदलले आणि तब्बल १५ वर्षानंतर घटनेतील तरुणाला दोषी ठवरवण्यात आलं आहे.
न्यायाधीशांनी आरोपी तरुणाला एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तर आरोपी तरुणाने हा खटला लढवता येत नसल्याचे सांगितले आहे. न्यायाधीशांनी आरोपीला एक वर्षाच्या प्रोबेशनची शिक्षेसह ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिवाय एका प्रेमपत्रामुळे तरुण अडचणीत सापडल्याच्या या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
२००८ साली दाखल केला होता गुन्हा –
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण कोतवाली शहरातील एका गावातील आहे. येथील एका महिलेने २००८ मध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गावातील अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये लिहिलं होतं की, तिची १४ वर्षांची मुलगी शाळेत जाताना एका तरुणाने तिचा विनयभंग करत अश्लील कृत्य केली.
२१ मे २००८ रोजी एका अल्पवयीन मुलाने एका लहान मुलाच्या हातून तिच्या मुलीला अश्लील पत्र पाठवले, शिवाय या पत्रात तुम्ही या प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यास मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ठार मारेन, असेही लिहिलं होतं. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर सन २००८ ते २०२३ या कालावधित म्हणजेच तब्बल १५ वर्ष या प्रकरणांची सुनावणी सुरु होती. या काळात अनेक न्यायाधीशांच्या बदल्या देखील झाल्या.
हेही पाहा- रेस्टॉरंटमधून मागवल्या नूडल्स, शेवटचा घास खाताना त्यात दिसला जिवंत बेडूक, पाहा धक्कादायक व्हिडीओ
तरुणाला एक वर्षाची शिक्षा झाली –
या खटल्याते प्रतिनिधित्व करणारे अभियोक्ता अधिकारी राजेश कुमार यांनी सर्व युक्तिवाद न्यायाधीश बिडी गुप्ता यांच्यासमोर ठेवले. आरोपीने न्यायाधीशांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय न्यायमूर्तींनी आरोपीने चांगले वर्तन केल्यामुळे एक वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र, आरोपीने न्यायाधीशांची माफी मागितली आणि तो खटला लढण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. तसेच पुन्हा अशी चूक करणार नसल्याचेही आरोपीने सांगितले. त्यावर न्यायाधीशांनी आरोपीला एक वर्षासाठी प्रोबेशनची शिक्षा सुनावली, म्हणजेच तो एक वर्ष फिर्यादी अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली राहील. या काळात त्याने कोणती चूक केली तर त्याला शिक्षा भोगावी लागू शकते. शिवाय त्याला दर महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रोबेशन ऑफिसरसमोर हजर राहावे लागणार आहे.