‘डब्लू डब्लू ई’ हा खेळ फक्त ताकद दाखविण्याचा खेळ आहे असे जर तुम्ही समजत असाल तर ते अगदी चुकीचे आहे. या खेळाच्या आखाड्यात पाहायला मिळणारी टक्कर सामन्यांच्यावेळी ऐकायला आणि पाहायला मिळणारे वादग्रस्त समालोचन आपण पाहिले आहे. खेळाच्या आखाड्याबाहेरील समाजसेवेचे कामही ‘डब्लू डब्लू ई’ च्या माध्यमातून केले जाते. ‘डब्लू डब्लू ई’चा समाज कार्यातदेखील सहभागी असतो. मैदानात एकमेकांची टक्कर दाखविणाऱ्या खेळाचे समाजसेवेसाठीदेखील महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्तन कर्करोगाला मात देण्यासाठी ‘डब्लू डब्लू ई’चे योगदान महत्वपूर्ण आहे.
‘डब्लू डब्लू ई’ या खेळात जखमी पहेलवानांबाबत फारशी काळजी घेतली जात नाही, असा समज आहे. पण यात सत्य नाही. या खेळामधील कौशल्य दाखवून देणाऱ्या खेळाडूला शिक्षणासाठी ५ हजार डॉलरची शिष्यवृत्ती दिली जाते. ज्यामुळे त्याला विद्यापीठात चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता येऊ शकते. ही शिष्यवृत्ती तीन खेळाडूंना दिली जाते. मागील वर्षी ही शिष्यवृत्ती सुपरस्टार पॉल बर्चिल, डिवा मारिया आणि थॉमसन यांना प्रदान करण्यात आली होती.
‘एलजीबीटी’ या दुर्लक्षित घटकाला समाजात स्थान देण्यासाठी डब्लू डब्लू ई प्रयत्नशील आहे. यासाठी ‘ग्लॅड’ नावाच्या उपक्रमातून समलिंगी आणि तृतियपंथीयांसाठी ‘डब्लू डब्लू ई’ कार्यरत आहे. समलैंगिक आणि तृतियपंथी समाजाला प्रोत्साहीत करण्यासाठी ‘ग्लॅड’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. त्यांना समाजात समान हक्क मिळवून देण्यासाठी डब्लू डब्लू ई प्रयत्न करत आहे. या दुर्लक्षित घटकाला व्यक्त होण्यासाठी ‘डब्लू डब्लू ई’ त्यांना व्यासपीठ निर्माण करुन देते.
अमेरिकेतील लहान मुलांसाठी ‘डब्लू डब्लू ई’च्या माध्यमातून शालेय स्तरावर ‘बी ए स्टार’ नावाचा उपक्रम राबविण्यात येतो. ज्यातून लहान मुलांमधील भयभीतपणा दुर करण्याचे काम केले जाते. ‘डब्लू डब्लू ई’च्या समाजसेवेमध्ये सैन्यासाठी देखील काम केले जाते. यासाठी अमेरिकन लष्करी सैनिकांसाठी प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये विशेष सामने आयोजित केले जातात. यामध्ये सैन्यातील तरुणांना प्राधान्य दिले जाते. अमेरिकन सैनिकांच्या भेटी देखील खेळाडू घेत असतात. ‘डब्लू डब्लू ई’ च्या माध्यमातून कर्करोगावर (कॅन्सर) मात करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून कर्करोगाच्या जागृतीसाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘डब्लू डब्लू ई’च्या माध्यमातून जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येते.