देशभरातली विकासकामं कोट्यवधी करदात्यांकडून भरल्या जाणाऱ्या कराच्या रकमेतून केली जातात. यावरून अनेकदा राज्य व केंद्र सरकार यांच्यात हिस्सा देण्यात होणाऱ्या विलंबावरून चर्चा झाल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे कराची रक्कम ही एकीकडे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आर्थिक स्त्रोत असताना दुसरीकडे अनेक करदात्यांसाठी मात्र हा खिशाला बसणारा आर्थिक भुर्दंड ठरतो. काही बाबतीत तर अकारण होणारा खर्चही ठरतो! सोशल मीडिया साईट एक्सवर एका युजरनं केलेली अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणाची आहे पोस्ट?

अपूर्व जैन नावाच्या एका व्यक्तीने एक्सवर Enginerd नावाच्या अकाऊंटवरून केलेल्या पोस्टवर दिलेल्या कमेंटमध्ये यासंदर्भात उल्लेख केला आहे. अपूर्व जैन हे दिल्लीचे राहणारे असून त्यांना करापोटी आलेल्या एका नोटिशीमुळे तब्बल ५० हजार रुपयांचा भुर्दंड पडल्याचं त्यांनी या कमेंटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे करभरणासंदर्भात इतका खर्च खरंच होतो का? अशी विचारणा देखील होऊ लागली आहे.

काय आहे मूळ पोस्ट?

Enginerd नावाच्या अकाऊंटरून करण्यात आलेल्या मूळ पोस्टमध्ये पीएफवरील व्याजावर कर आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा उल्लेख करण्यात आला आहे. “निर्मला सीतारमण यांनी पीएफवरच्या व्याजावर कर आकारण्याचा निर्णय घेऊन आता जवळपास तीन वर्षं उलटली. पीएफच्या व्याजावर कर आकारणे हा निर्णयच मुळात नोकरदार वर्गासाठी क्रूर ठरला आहे. पण गंमतीची गोष्ट अशी की आपल्याला नेमका किती कर भरावा लागणार आहे, याची कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टवर अपूर्व जैननं कमेंट केली असून त्यात ५० हजार रुपये भरल्याचं म्हटलं आहे. “मला नुकतीच एक प्राप्तिकर नोटीस आली होती. त्या नोटिशीवर काम करण्यासाठी मी चार्टर्ड अकाऊंटंटला ५० हजार रुपये दिले. पण ज्या कररकमेसाठी ती नोटीस पाठवण्यात आली होती, ती अंतिम रक्कम १ रुपया निघाली”, असं या कमेंटमध्ये अपूर्व जैन यांनी म्हटलं आहे. शिवाय शेवटी “मी अजिबात विनोद करत नाही”, असंही त्यांनी लिहिलं आहे.

नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया

दरम्यान, नेटिझन्सकडून या चर्चेवर संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत. “या विभागाची अवस्था अशी आहे की इथलं काहीही मस्करी राहिलेलं नाही”, अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर दुसऱ्या युजरनं “मी त्या दिवसाची वाट पाहतोय ज्या दिवशी प्राप्तिकर विभाग श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकराची नोटीस पाठवेल”, असं म्हटलं आहे. एकानं चार्टर्ड अकाऊंटंटकडून आकारण्यात आलेल्या फीविषयी मुद्दा उपस्थित केला आहे. “५० हजार रुपये फी खूपच जास्त आहे. हल्ली चार्टर्ड अकाऊंटंट खूप पैसे आकारू लागले आहेत”, असं या युजरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.