देशात सर्वत्र सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्योरप करत असताना सोशल मीडियावर मात्र जरा वेगळीच चर्चा आहे. काही दिवसांपासून किंवा पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर पिवळ्या साडीतल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं, आणि आता दोन दिवसांपासून एका निळ्या ड्रेसमधल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पिवळ्या साडीतल्या या महिला अधिकाऱ्याचे दोन्ही हातात इव्हीएम घेऊन जातानाचे फोटो फेसबुक, व्हॉट्स अॅपवर शेअर होत होते.
त्यांचं नाव नलिनी सिंहअसून त्यांच्या पोलिंग बूथवर १०० टक्के मतदान झाल्याचाही मेसेज व्हायरल होत होता. जयपूर येथील हे फोटो असल्याचीही चर्चा होती. पण या महिला अधिकाऱ्याचं खरं नाव नलिनी सिंह नव्हे तर रीना द्विवेदी आहे आणि त्या लखनऊच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. तर त्यांचे फोटो वृत्तपत्र छायाचित्रकार तुषार रॉय यांनी काढल्याचं समोर आलं आहे.
रीना यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर एका नवीन महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणारी ही महिला अधिकारी कोण आहे? याबाबत सध्यातरी कुठलीही स्पष्ट माहिती नाही.
तरीही या महिला अधिकाऱ्याची हातातील बॅलेट युनिटवर लिहिलेल्या क्रमांकाच्या आधारे ही महिला भोपाळ लोकसभा मतदारसंघातील केंद्रावरील निवडणूक अधिकारी असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.