Yoga In Golden Temple: अमृतसरच्या सुवर्णमंदिरात योग केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी अर्चना मकवाना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शिरोमणी गुरुद्वारा संचालक समितीने शनिवारी अर्चना मकवानाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्चनाने २१ जून या दिवशी म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी सुवर्ण मंदिरात योग केला. यामुळे आमच्या पवित्र धार्मिक स्थळाचं पावित्र्य भंग झालं आहे असा आरोप शीख बांधवांनी केला आहे.

कोण आहे अर्चना मकवाना?

अर्चना मकवाना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. गुजरातच्या बडोदा या ठिकाणी House oF Archana नावाचं फॅशन ब्रँडही ती चालवते. तसंच Healing Tattvas या ब्रँडशीही ती संलग्न आहे. आपल्या प्रवासावर ती व्ह्लॉग करते. अर्चनाला इंस्टाग्रामवर १.४० लाखांहून जास्त लोक फॉलो करतात. फॅशन ब्लॉगर, ट्रॅव्हल ब्लॉगर, फॅशन डिझायनर असा तिचा ‘बायो’ आहे. अर्चनाने योग अभ्यास केला आहे. तसंच आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी योग अभ्यासासाठी आणि त्यातील योगदानासाठी अर्चाना मकवानाला पुरस्कारही देण्यात आले आहेत.

२१ जूनला नेमकं काय झालं?

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस असतो. अर्चना त्या दिवशी सकाळी सकाळी सुवर्ण मंदिरात पोहचली. तिथे तिने योगासनं केली तसंच शीर्षासनही केलं. हे फोटो अर्चनाने सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यानंतर शीख बांधव चांगलेच नाराज झाले. या घटनेनंतर शीख समुदायाने नाराजी व्यक्त केलीच, शिवाय SGPC चे अध्यक्ष हरजिंदर सिंह सामी यांनी तक्रार दाखल केली. तसंच ते म्हणाले, “काही लोक जाणीवपूर्वक मंदिराच्या पावित्र्याकडे डोळेझाक करत आहेत. या महिलेने जे केलं त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.” असं मंदिर समितीने म्हटलं आहे.

हे पण वाचा- इंदिरा गांधींच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारची ४० वर्षे! सुवर्ण मंदिरावर का करावी लागली कारवाई?

सुवर्ण मंदिर प्रशासनाने काय म्हटलं आहे?

SGPC ने यानंतर एक चौकशी समिती नेमली आहे. ही महिला योग करत असताना आणि शीर्षासन करताना तिला अडवलं का गेलं नाही? त्यावेळी तिथे कोण सेवेकरी होते? त्यांनी या महिलेला का समजावून सांगितलं नाही? या सगळ्याची चौकशी या चौकशी समितीतर्फे केली जाते आहे. तसंच या प्रकरणी तीन सेवेकऱ्यांविरोधात कारवाईही करण्यात आली आहे. सुवर्ण मंदिराचे महासंचालक भगवंत सिंह धंगेरा यांनी म्हटलंय की, “सीसीटीव्ही फुटेजद्वारे हे कळलं आहे की अर्चनाने सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी योग सुरु केला. त्यानंतर ती तासभर परिक्रमा करत होती. मात्र श्रद्धेचा अभाव दिसून आला.”