Yogi Adityanath Viral Video: लाइटहाऊस जर्नलिज्मला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे लक्षात आले. या व्हिडीओमध्ये ते देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, असे म्हणताना दिसत होते. तुम्हाला देशाची मुस्लीम, बिगर मुस्लिम आणि अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांच्या नावावर फाळणी करायची आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणतात. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता अचानक योगींच्या वक्तव्याचा सूर बदलला आहे अशा दाव्यासह लोकांनी व्हिडीओ शेअर केला आहे. तपासादरम्यान या व्हिडीओची एक वेगळी बाजू समोर आली आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ यांनी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचाही हवाला दिल्याचे लक्षात येतेय. नेमकं यात किती तथ्य आहे हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर नौशादने हा व्हिडीओ त्याच्या प्रोफाईलवर शेअर केला आहे.

इतर वापरकर्ते देखील याच दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि त्यातून अनेक कीफ्रेम मिळवून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही व्हिडिओमधून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर इमेज सर्च सुरू केला. आम्हला या व्हिडीओवर ‘पत्रिका राजस्थान’ वॉटरमार्क देखील दिसला. आम्हाला ANI द्वारे X (पूर्वीचे ट्विटर) वर अपलोड केलेला योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सापडला, जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडीओसारखीच होती.

आम्ही त्यानंतर असाच एक व्हिडीओ ANI च्या युट्युब चॅनेल वर शोधून काढला.

सुमारे ४ मिनिटांनी ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा हवाला देताना दिसत आहेत. ते म्हणतात, “देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, असे मनमोहन सिंग कोणाच्या सांगण्यावरून म्हणाले होते? तुम्हाला देशाची मुस्लिम-गैर-मुस्लिम आणि बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांच्या नावावर फाळणी करायची आहे”.

व्हिडीओ एका महिन्यापूर्वी अपलोड करण्यात आला होता आणि त्याचे शीर्षक होते (भाषांतर): मुख्यमंत्री योगी यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला समर्थन दर्शवले. मुस्लिम आणि गैर-मुस्लिमांमध्ये फूट निर्माण केल्याबद्दल काँग्रेसला दोषी ठरवले

आम्हाला पत्रिका राजस्थानच्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेला मूळ व्हिडीओ देखील सापडला. व्हिडीओवरील मजकूर (अनुवाद): मुख्यमंत्री योगी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि म्हटले की त्यांना देशाचे विभाजन करायचे आहे.

निष्कर्षः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असे म्हटले नाही. क्लिप केलेला व्हिडिओ खोट्या दाव्यांसह व्हायरल होत आहे.