अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे अखेर समोर आले. तिने एक व्हिडीओ पोस्ट करत ती जिवंत असून लोकांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी असे केल्याचे सांगितले. पण, पूनमच्या या विचित्र पीआर स्टंटमुळे आता ती टीकेची धनी ठरत आहे. सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अनेकांनी हा आत्तापर्यंतचा सर्वात वाईट पीआर स्टंट असल्याचे म्हणत तिच्यावर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या संवेदनशील समस्येचा गैरवापर केला गेल्याचा आरोप केला आहे. पण, या प्रकरणामुळे सोशल मीडियावर सध्या #Poonampandey हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. या ट्रेंडमध्ये आता दिल्ली पोलिसांनी उडी घेत लोकांना रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत जागरूक केले आहे.
पूनम पांडे केस लक्षात घेत दिल्ली पोलिसांनी ही पोस्ट केली आहे. पोलिसांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, होय होय, इकडे तिकडे पाहू नका, फक्त तुमच्याबद्दलच बोलणं सुरू आहे. पोलिसांनी याबरोबरच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर लिहिले आहे की, तुम्ही हो तुम्हीच! तुम्ही अंडरटेकर, मिहिर विराणी किंवा कोणती स्पेशल केस नाहीत की पुन्हा जिवंत व्हाल. त्यामुळे नेहमी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा. या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी लोकांना रस्ते सुरक्षेबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे.
पूनम पांडे होती कोट्यवधींची मालकीण; अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या
दिल्ली पोलिसांची ही अनोखी पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, याबरोबर पूनम पांडेचं नावही यायला हवे होते. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, हा नवीन मीमर कोण आहे? अहो, हे दिल्ली पोलिसांचे पेज आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, हे दिवसेंदिवस माझे आवडते मीम पेज होत आहे. यावर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, कृपया पूनम पांडेवर गुन्हा दाखल करा आणि कृपया तुमचा पेज अॅडमिन बदला.