सध्या असा कोणीही नसेल जो व्हॉट्सअॅप हे अॅप वापरत नसेल. या अॅपमुळे लोकं एकमेकांच्या आणखीनच जवळ आली आहेत. आता एकमेकांपासून लांब राहणारे कुटुंबीय व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात. या फॅमिली ग्रुप्सवर कधी गंभीर तर कधी मजेशीर गोष्टी घडत असतात. सध्या अशाच एका फॅमिली ग्रुपमधील चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या स्क्रीनशॉटने धुमाकूळ घातला आहे. या चॅटमधील वडिलांचा मेसेज वाचल्यावर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. त्यांनी कधी विचारही केला नसेल की त्यांना असे काहीतरी वाचायला मिळेल. त्याचं झालं असं, ऑनलाइन जेवण ऑर्डर करताना मुलाकडून चूक झाली होती. त्याने ऑर्डर करताना चुकीचा पत्ता दिल्यामुळे ऑर्डर दुसऱ्याच ठिकाणी पोहोचली. त्याने आपली चूक फॅमिली ग्रुपमध्ये सांगितली आणि रिफंड मिळाल्याचेही सांगितले. यानंतर वडिलांनी जो रिप्लाय दिला, तो वाचून नेटकरी चाट पडले आणि त्या काकांचे फॅन झाले.
व्हॉट्सअॅप चॅटचा हा स्क्रीनशॉट जितू गलानी या ट्विटर युजर शेअर केला आणि लिहिले – रोस्टेड चिकन खायचे होते पण मलाच रोस्ट केले गेले. असा दावा केला जात आहे की हा स्क्रीनशॉट एका फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चॅटचा आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीने मेसेज केला आहे, ‘स्विगीकडून रिफंड मिळाला, ऑर्डर चुकीच्या ठिकाणी देण्यात आली.’
यावर त्याच्या वडिलांनी उत्तर दिले, ‘तुही चुकून ऑर्डर झाला होतास, पण मला तर रिफंड मिळाला नाही.’ यावर आईने हसण्याची इमोजी शेअर केली. यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने म्हटलं, ‘पपांनी एकदम खरं सांगितलं.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘वडिलांशी कधी पंगा घ्यायचा नसतो.’