Viral News: हल्ली सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होतच असतं. ज्यामध्ये अनेकदा शाळेतील मुलांच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरं, गाड्यांच्या मागचे हटके डायलॉग, अतरंगी जाहिरातींचे फोटो, पुणेरी पाटी हातात घेऊन उभे असलेल्या तरुणांचे फोटो, व्हिडीओ प्रचंड चर्चेत असतात. या सगळ्या व्हायरल फोटोंमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे त्यावर लिहिलेला आशय असतो. जो अनेकदा खूप वेगळा आपल्या विचारांच्या पलीकडचा असतो, जो वाचून कोणालाही हसू येतं. अशातच आता आणखी एका तरुणाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्याच्या हातातील पाटी वाचून तुम्हीही अवाक व्हाल.
नव्या प्रेमाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा अनेक प्रेमी ते प्रेम आयुष्यभर निभावण्याचे वचन एकमेकांना देतात, पण पुढे जाऊन अनेकदा हे वचन अपूर्णच राहते. बऱ्याचदा यात दोघांचीही चुकी असते किंवा दोघांतील एकाची चुकी असते. या विषयाला उद्देशून अनेक रिल्स, गाणी सोशल मीडियावर व्हायरल झालेली तुम्ही पाहिलीच असतील. अर्थात, या गोष्टी अनेकदा मनोरंजन म्हणून टाकल्या जातात. आता व्हायरल झालेल्या या फोटोतील पाटीमध्येही असंच काहीतरी गमतीशीर पद्धतीने लिहिल्याचे दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण भररस्त्यात हातात एक पाटी घेऊन उभा आहे. या पाटीवर असं काहीतरी लिहिलंय, जे वाचून तुम्हालाही हसू येईल. या पाटीवर लिहिलंय की, “भावा, तू तिला कितीही रंग लाव, पण एक दिवस ती तुझं आयुष्य बेरंग करणार”, हा तरुण या पाटीद्वारे तरुणांना सल्ला देताना दिसत आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हायरल फोटो इन्स्टाग्रामवरील @ag_creation_004 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच याला सहा हजारांहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. यातील एका युजरने लिहिलंय की, भाऊ जरा जास्तच खरं बोलला, तर दुसऱ्याने लिहिलंय की, हो हे तर खरं आहे भावा. तर आणखी एकाने लिहिलंय की, हो आता सावध राहायला हवं; तर अनेक जण या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वीदेखील अशाप्रकारच्या अनेक पाट्यांचे फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तरुणांनी अनेक विविध विषयांवरील संदेश लोकांपर्यंत पोहोचवले होते. एका तरुणाने लिहिलं होतं की, “मुलींना शेती हवी, पण शेतकरी नवरा नको”, तर आणखी एकाने लिहिलं होतं की, “गुलाबी साडीवर डान्स करून काही होत नाही, स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरा.”