Pune Shocking video: सोशल मीडियावर निरनिराळ्या ट्रेकिंग, पर्यटन मोहिमांची यादी वाढत चालली आहे. निसर्गामध्ये साहसी मोहिमांना जरूर जा; पण गेल्या काही वर्षांत ट्रेकिंगदरम्यान वाढत असलेले अपघात लक्षात घेऊन आपण कोणाबरोबर मुलांना पाठवतोय किंवा स्वत: जायचे वा कसे, याची व्यवस्थित माहिती घ्या. सह्याद्री पावसाळ्यात जितका सुंदर बनतो तितकाच तो रौद्र रूपदेखील धारण करू शकतो हे सह्याद्रीत भटकताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इतरांचे ट्रेकचे फोटो, धबधबा, जंगल, डोंगर येथील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की, येणाऱ्या शनिवार-रविवार ट्रेक, अॅडव्हेंचर करण्याची इच्छा अनिवार होते. अनेकांनी या वीकेंडला ट्रेंकिंगला जाण्याचे प्लॅनही केले असतील. मात्र, त्याआधी हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा. पुणेकरांनो, तुम्हीही जर आडराई जंगल ट्रेकला जाण्याचा विचार करीत असाल, तर थांबा… अचानक पाणी वाढल्यानं पर्यटक कशा प्रकारे अडकले आहेत, हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. याचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय?
सह्याद्रीतील सर्वांत सुंदर आणि अनोळखी जंगलांपैकी एक म्हणजे आडराई जंगल ट्रेक. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून पावसाळ्यात गड-किल्ल्यांवर जाणे टाळा, असा सल्ला देण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही ट्रेकिंगचा प्लॅन करताना नक्की विचार कराल. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, आडराई जंगल ट्रेकला गेलेले पर्यटक ओढ्याच्या पलीकडे अडकले आहेत. जाताना या ठिकाणी पाणी कमी असल्याने ते पलीकडे सहज गेले; मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यानं त्यांना परत येणं शक्य होत नव्हतं. मात्र येताना पाण्याचा प्रवाह वाढल्यानं त्यांना रेस्क्यू करणंही शक्य नव्हतं. पाण्याचा प्रवाह इतका वाढला होता की, त्यांची करतानाही पर्यटक वाहून जाण्याची दाट शक्यता होती.
व्हिडीओ पाहून प्लॅन नक्की कॅन्सल कराल
यावेळी पलीकडे अडकलेल्या तरुणाची अवस्था पाहून तुम्हालाही घाम फुटेल. हा तरुण प्रचंड घाबरलेला असून वारंवार काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याला तिथेच थांबण्यासाठी सांगितलं जात आहे; तर दुसरीकडे अंधारही पडत आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पाणी कमी होण्याची वाट पाहिली आणि जसे पाणी कमी झाले तसे त्यांना तिथून बाहेर काढण्यात आले.
हा व्हिडीओ ४ तारखेचा म्हणजेच रविवारचा आहे. सुट्टी असल्यानं बऱ्याच पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. हा व्हिडीओ photoshoot_click नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी युजरने व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये “एका वॉटरफॉल ट्रेकला गेलो होतो. अचानक पाऊस जास्त झाला आणि वॉटरफॉलचा प्रवाह वाढला. त्यामुळे एक व्यक्ती दुसऱ्या बाजूला अडकली होती. यावेळी आम्ही रोप बांधून रेस्क्यू करायचं ठरवलं; मात्र पाणी जास्त असल्यामुळे तेव्हा ते शक्य नव्हतं. अशा वेळी पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट बघावी. पाणी कमी झाल्यानंतर त्याचं रेस्क्यू झालं”, अशी माहिती दिली आहे.
पाहा व्हिडीओ
दरम्यान अशावेळी काय खबरदारी घ्यावी हे सुद्धा त्यानं सांगितलं आहे.
टिप:
१. स्वतःची काळजी घ्या.
२. अचानक पाऊस वाढल्यास सुरक्षित ठिकाणी थांबा.
३. पाण्याचा प्रवाह वाढल्यास, कमी होण्याची वाट बघा.
४. प्रवाह कमी झाल्यावरच वॉटरक्रॉसिंग करा.
५. आवश्यक साधनं आणि मदत साहित्य जवळ ठेवा.
६. ट्रेकिंगला नेहमी Trekking ग्रुपसोबत जा.
७. अशा स्थितीत घाबरू नका, शांतता राखा.