वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत.
अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतायत. त्यात काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी घाबरून शांत बसतात. अशा काही विकृत लोकांवर कारवाईदेखील होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण भररस्त्यात एका तरुणीची छेड काढताना दिसतोय.
तरुणाने काढली छेड
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, भररस्त्यात एका तरुणानं एका तरुणीचा रस्ता अडवला आहे आणि तिला त्रास देण्याचा तो प्रयत्न करताना दिसतोय. तसेच तो तिच्याशी काहीतरी बोलतानाही दिसत आहे. पण, त्या तरुणाला घाबरून तरुणी तिथून पळून गेल्याचं या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. त्यानंतर व्हिडीओमध्ये तोच तरुण पोलिसांच्या जीपमधून उतरताना दिसतोय. त्याला दोन पोलीस पकडून घेऊन येताना या व्हिडीओमध्ये दिसतंय. पोलिस त्याला बेदम चोप देत, कोतवाली नई मंडीच्या पोलिस ठाण्यात घेऊन जाताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मुझफ्फरनगरच्या नई मंडी भागात रस्त्यावर चालणाऱ्या एका मुलीला थांबवून त्रास देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी आरोपी रोहितला अटक केली आणि त्याला चांगलीच अद्दल घडवली,’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून, अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “आता कोणत्याही मुलीकडे डोळे वर करून बघणार नाही.” तर दुसऱ्यानं, “पोलिसांनी अगदी बरोबर कारवाई केली आहे,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “पोलिसांनी खूप चांगलं केलं.”