भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील वाढत्या तणावामुळे एकाचे वैवाहिक जीवन सुरु होण्यापूर्वीच संपण्याची वेळ आली आहे. जोधपूर येथे राहणा-या नरेश तिवानी याचे पाकिस्तानातील कराची येथे राहणा-या तरुणीशी लग्न ठरले. मात्र वधुला व्हिसा मिळत नसल्याने अवघ्या काही दिवसांवर आलेले लग्न पुढे ढकलण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे मदतीसाठी या नव-याने भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना साकडे घातले आहे.
नरेश तिवानी याचे येत्या ७ नोव्हेंबरला लग्न आहे. घरी लग्नाची सगळी तयारी देखील झाली आहे पण ऐनवेळला त्याच्या होणा-या पत्नीला सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनही भारतीय दूतावासातून व्हिसा नाकारला जात आहे. त्यामुळे निराश झालेल्या नरेशने सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे. व्हिसासाठी लागणा-या सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही आपल्या होणा-या पत्नीला वारंवार फे-या माराव्या लागत असल्याची खंत त्याने बोलून दाखवली. अशा प्रकराचे ट्विट करत त्याने स्वराज यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. स्वराज यांनी देखील नरेशच्या ट्विटची दखल घेत तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘नरेशच्या पत्नीला लवकरात लवकर व्हिसा मिळून देण्याची सोय करण्यात येईल, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही’ असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. नरेशच्या पत्नीचे नाव प्रिया बच्चानी असून त्यांचा दोन वर्षांपूर्वीच साखडपुडा झाला होता. लग्नासाठी लवकरात लवकर व्हिसा मिळावा यासाठी प्रियाच्या वडिलांनी स्थानिक नेत्यांना देखील गळ घातली होती पण तिथून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वराज यांच्याकडे मदतीची अपेक्षा केली आहे.

Story img Loader