आपल्याला एखादे गोंडस मांजरीचे पिल्लू किंवा कुत्र्याचे पिल्लू दिसल्यानंतर त्याला आपण प्रेमाने आंजारतो-गोंजारतो. अगदी त्याच्या नाकाची किंवा डोक्याची पापी घेतो. असे आपण पाळीव प्राण्यांबरोबर करतो. मात्र काही धाडसी व्यक्ती थेट वाघ, सिंह, साप आणि अगदी मगरीला किंवा अशा जंगली, हिंस्त्र प्राण्यांचे, त्यांच्या पिल्लाचे लाड करतानाचे अनेक व्हिडीओ खरे तर सोशल मीडियावर शेअर होत असतात. मात्र, असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @lounatic11 नावाच्या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एका तरुणाने हातामध्ये मगरीचे एक लहानसे पिल्लू पकडले होते. ते पिल्लू लहान असले तरीही आकाराने बऱ्यापैकी मोठे आहे. व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती तरुणाला मजा-मस्तीत, “किती गोड कुत्र्याचे पिल्लू आहे… कोणत्या जातीचे आहे?”, असे विचारते. नंतर “या गोंडस पिल्लाच्या डोक्यावर किस कर,” असे सांगते. त्यावर व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती अजिबात न घाबरता, त्या मगरीच्या पिल्लाच्या डोक्यावर आपले ओठ टेकवते.
मात्र, मगरीच्या पिल्लाने अगदी त्याच क्षणी त्या तरुणाच्या नाकाचा चावा घेतल्याचे आपण पाहू शकतो. तरुण अगदी घाईघाईने त्या पिल्लाला आपल्या नाकापासून खेचून दूर करतो. व्हिडीओच्या शेवटी हातात मगरीचे पिल्लू धरलेल्या तरुणाने त्याच्या नाकाचा फोटोदेखील दाखविला आहे. त्याच्या नाकावर मगरीच्या पिल्लाच्या दाताच्या खुणा आणि रक्त आपण पाहू शकतो. त्याने फोटोबरोबर ‘असा झाला शेवट’ [how it ended] असा मजकूर लिहिलेला आहे.
सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओवर मात्र नेटकऱ्यांनी भरपूर आणि अतरंगी प्रतिक्रिया लिहिल्या आहेत, त्या पाहू.
“काही नाही, त्या पिल्लालासुद्धा तुला किस करायचं होतं,” असे एकाने म्हटले आहे. दुसऱ्याने, “ते मगरीचे पिल्लू शेवटी हसत आहे, असं वाटतं,” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “मूर्खासारखे खेळ खेळून मूर्खपणाचे बक्षीस जिंका!”, असे लिहिले आहे. “पुढच्या वेळेस असे काही करताना त्या प्राण्याचा जबडा हातानं आधी पकडून ठेवा,” अशी सूचना चौथ्याने दिली आहे. तर शेवटी पाचव्याने, “अनेक जण सांगत असतात की, विनाकारण जंगली जनावरांच्या जास्त जवळ जाऊ नये. त्यांच्या नादी लागू नये. मला वाटतं ते अशाच कारणांमुळे असेल,” असे लिहिले आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ८.७ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.