Viral Post :- करोना महामारीत जगावर आर्थिक संकट आले. त्यादरम्यान लॉकडाऊन लागल्यानंतर अनेकांची ऑफिसेस तत्काळ बंद करण्यात आली. त्या काळात कुटुंबासाठी, पोटापाण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे छोटे छोटे व्यवसाय सुरू केले. त्यांनी विविध घरगुती लघुउद्योगांना सुरुवात केली. तसेच अनेकदा तरुण पिढीला तुम्ही बोलताना ऐकले असेल की, माझ्या जॉबचं काही खरं नाही; मी थोड्या दिवसांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करणार.पण,असे फक्त बोलून दाखवणारे आणि आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयन्त करणारे फार कमी असतात. तर आज असेच काहीस सोशल मीडियावर पाहायला मिळाले. एका छोट्या स्टॉलवर कॉफी विकणाऱ्याचे मोठे स्वप्न ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल.
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे; ज्यात एका तरुण युवकाने रस्त्याच्या कडेला एक छोटासा कॉफीचा स्टॉल उभारल्याचे दिसते. या तरुणाचे नाव मयंक पांडे, असे आहे. मयंकचा हा स्टॉल मुंबईतील कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज इथे आहे, असे सांगितले जात आहे. ‘द कॉफी बार’, असे या तरुणाच्या कॉफी स्टॉलचे नाव आहे. या स्टॉलवर कॅफेचिनो, मोचा, लाटे, ब्लॅक कॉफी अशा विविध प्रकारच्या कॉफीचा तुम्ही कमी पैशात आनंद घेऊ शकता. तसेच स्टॉलवरील सगळ्यात खास गोष्ट अशी की, या तरुणाला त्याच्या ‘द कॉफी बार’ला (Global Market) म्हणजेच जागतिक बाजारपेठेत न्यायचे आहे. हे त्याचे स्वप्न असल्याचे त्याने स्टॉलवरील एका पोस्टरवरही लिहिले आहे; जे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. जागतिक बाजारपेठेमुळे तुम्हाला तुमचे उत्पादन विकण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, वेगवेगळ्या देशांमध्ये तुमचा व्यवसाय वाढवण्याची परवानगी मिळते. तुमच्या ठरावीक व्यवसायाचा प्रभाव वाढल्यामुळे विविध देशांच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो.
हेही वाचा :- किळसवाणा प्रकार! कांदा- मिरचीच्या फोडणीत टाकले झुरळ; नंतर भाजून चटणीसोबत खाल्ले; Video व्हायरल
नक्की बघा पोस्ट :-
सोशल मीडियावर या तरुणाच्या कॉफी स्टॉलचा फोटो डी. प्रशांत नायर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यांना या तरुणाच्या कॉफी स्टॉलला जागतिक बाजारपेठेत नेण्याच्या स्वप्नाचं कौतुक वाटलं आहे आणि एक दिवस त्याचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांना अभिमान वाटतोय की, आजच्या काळातले तरुण आणि तरुणी अशी मोठमोठी स्वप्नं पाहतात, असे त्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अनेकांनी या पोस्टवर या तरुणाचा स्टॉल अनेकदा पाहिला असल्याचा दावा केला आहे; तर अनेकांनी या तरुणाचं स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं, अशी इच्छा कमेंटमधून व्यक्त केली आहे. छोटासा का होईना आपला एक व्यवसाय असावा, असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि स्वप्न बघितली तरच ती सत्यात उतरवली जाऊ शकतात, हे या तरुणाने आज स्पष्ट केले आहे.