सोशल मीडियावर साप, अजगराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील अनेक व्हिडीओ खरचं अंगावर काटा आणणारे असतात. कारण साप, अजगर हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांचा भीतीने थरकाप उडतो. कुठेही सरपटत जाणारे हे प्राणी कधी कुठे जाऊन लपून बसतील सांगता येत नाही. विशेषत: मानवी वस्तीत साप, अजगर हमखास पाहायला मिळतात. तेथील झाडीझुडपात हे अगदी आरामात लपून बसलेले असतात. सध्या असाच एका झुडपात लपून बसलेल्या अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती त्या महाकाय अजगर पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पण काही वेळातच एक लहान मुलगा तिथे पोहोचतो आणि अजगराच्या तोंडाला पकडतो. जे पाहून तिथे उभ्या असलेले लोकही खूप घाबरतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ कर्नाटकातील साळीग्राम येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका वयस्कर व्यक्ती एक मोठा अजगराच्या शेपटीला धरुन त्याला झुडपातून बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा अजगर इतका मोठा आहे की तो एकट्याने खेचून बाहेर आणू शकत नाही. यावेळी गावकरी सर्व घटना दूरुन पाहत असतात. तितक्यात तिथे एक लहान मुलगा येतो आणि तो अजगराचे तोंड पकडण्याच्या उद्देशाने झुडपाजवळ जातो. पण अजगर इतका मोठा असतो तो मुलगाही हाताने त्याचे तोंड पकडताना थोडा घाबरतो. पण काही क्षणात तो अजगराचं तोंड पकडून दाबून ठेवतो. यावेळी अजगर दोघांनाही विळखा घालण्याचा प्रयत्न करतो, पण हार न मानता लहान मुलासह तो व्यक्तीही पूर्ण ताकदीने अजगराला पकडून एका गोणीत टाकतात आणि सुरक्षित ठिकाणी सोडतात. आता नेटिझन्सनी या मुलाच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ DpHegdens या एक्स (पूर्वीचे ट्विटर ) अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.