Mumbai Local Shocking Video : देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही सर्व दृष्टीने सुरक्षित मानली जाते. मुंबईत रात्री-अपरात्री कितीही वाजता गेलात तरी तुम्हाला अनेक रेल्वेस्थानकांवर, बाहेर गर्दी पाहायला मिळेल. मात्र, रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करताना महिलांना कितपत सुरक्षित वाटतं हा मोठा प्रश्न आहे. सध्या सोशल मीडियावर धावत्या लोकलमधील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणाने महिलांबरोबर अतिशय असभ्य वर्तन केल्याचे सांगितले जात आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतच काय महिला कुठेही सुरक्षित नसल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे पाहायला मिळते. अशीच एक घटना मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांबरोबर घडली आहे, ज्यात एक तरुण धावत्या लोकलमध्ये महिलांना शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळतेय. यानंतर महिलांनी त्या तरुणास चांगलाच धडा शिकवला. पण, या घटनेवरून मुंबई लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लोकलमध्ये महिला प्रवाशांना केली शिवीगाळ अन्…
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे; एक तरुण लोकलमधील अपंगांच्या डब्यातून महिलांना शिवीगाळ करत होता. यावेळी एका महिलेने महिला डब्यातून तरुणाचा हात घट्ट पकडून ठेवला. यावेळी आजूबाजूच्या महिला त्या तरुणाला मारा असे म्हणताना ऐकू येतंय, तर तरुणाचा हात पकडून ठेवलेली महिला असे म्हणताना ऐकू येतेय की, महिलेवर हात उचलतोस काय, ट्रेनची चेन ओढा लवकर. यावरून असा अंदाज बांधला जात आहे की, संबंधित तरुणाने महिलांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे महिलांनी त्याला चांगलाच धडा शिकवला. तरुण ट्रेनमधून उतरून पळू जाऊ नये म्हणून एका महिलेने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. यावेळी घडलेला हा प्रकार त्याच डब्यातील एका प्रवासी महिलेने मोबाइलमध्ये कैद करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ sangita_varanasi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, यावर आता लोक संताप व्यक्त करत आहेत.