देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे, अनेक ठिकाणी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, तर काही लोकांच्या गाड्या पाण्यातून वाहून गेल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पावसामुळे मुक्या प्राण्यांचे हालदेखील मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. तर काही लोक या प्राण्यांना वाचवण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियायवर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोकांनी गायीला पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापासून वाचवलं आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून गायीला वाचविणाऱ्या लोकांचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या व्हिडीओत मुस्लीम तरुणानेही गायीला वाचवण्यासाठी मदत केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ मानवतेचे आणि एकतेचे सुंदर उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.
पुराच्या पाण्यात अडकली होती गाय –
व्हायरल व्हिडिओमध्ये एक गाय पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहातून वाहत जाताना दिसत आहे. यावेळी ती एका ठिकाणी अडकते, अशा परिस्थितीत दोन तरुण गायीच्या शिंगाना पकडून तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. ते खूप प्रयत्न करतात, मात्र गायीच्या जास्त वजनामुळे ते दोघे गायीला पाण्यातून बाहेर काढू शकत नाहीत. याचवेळी तेथून जाणारे आणखी दोन लोक त्यांच्या मदतीला येतात आणि हे चौघे मिळून गायीला पाण्यातून बाहेर काढतात.
हा व्हिडिओ GiDDa CoMpAnY नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या प्रमाणात पाहिला जात आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “एका क्लिपमध्ये दोन सुंदर गोष्टी.” आतापर्यंत या व्हिडिओला ७४ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि १६ हजार लाइक्स मिळाले आहेत. तर अनेक नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे, “हे या देशाचे सौंदर्य आहे…” तर दुसऱ्याने लिहिलं आहे, “माणुसकीचा कोणताही धर्म नसतो.” तर तिसऱ्या युजरेने लिहिलं की, धर्म एकमेकांशी वैर ठेवायला शिकवत नाही.