युट्यूबर ध्रुव राठी हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ध्रुव राठीच्या व्हिडीओंना लाखो लोक पाहतात. त्याचा चाहता वर्ग मोठा आहेच, त्याशिवाय त्याचा विरोध करणाराही एक मोठा वर्ग आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ध्रुव राठीने गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये त्याने मोदी सरकारवर टीका केली आहे. निवडणूक रोखे, भारतातील हुकूमशाही हे त्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले, लाखो लोकांनी ते शेअर केले आहेत. त्यानंतर आता ध्रुव राठीबद्दल एक वेगळाच मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. ज्याबद्दल ध्रुवने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माझ्या व्हिडीओला उत्तर नसल्यामुळेच असे मेसेज व्हायरल केले जात असल्याचे त्याने म्हटले.
माझी पत्नी आणि तिच्या कुटुंबाला यात का खेचता?
ध्रुव राठी हा मुस्लीम असल्याचा एक दावा सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. ज्यामध्ये त्याचे खरे नाव बद्रूद्दीन रशीद लाहोरी आणि त्याची पत्नी ज्युली ही पाकिस्तानी असल्याचे म्हटले गेले आहे. ज्युलीचे खरे नाव झुलैखा असून ध्रुव आणि ती दाऊद इब्राहिमच्या कराचीमधील बंगल्यात पाकिस्तानी लष्कराच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहत आहे, असाही दावा व्हायरल मेसेज करण्यात आला आहे.
यानंतर ध्रुव राठीनं एक्सवर एक पोस्ट टाकून यावर प्रत्युत्तर दिले. “माझ्या व्हिडीओंना त्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळे ते अफवा पसरविण्याचे काम करत आहेत. आता तर त्यांनी हद्दच केली असून माझ्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबालाही यात खेचले आहे. यातून आयटी सेल कर्मचाऱ्यांचा घृणास्पद नैतिक दर्जाही तुम्ही पाहू शकता”, असे उत्तर ध्रुव राठीनं दिलं आहे.
ध्रुव राठी हा २०१३ पासून युट्यूबवर व्हिडिओ तयार करत आहे. आजवर त्याने ६०० हून अधिक व्हिडीओ तयार केले असून ते युट्यूबवर अपलोड केले आहेत. त्याला युट्यूबवर १९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक विषय आणि सरकारविरोधातील विषयांवर ध्रुव राठीने व्हिडीओ तयार केले आहेत. ज्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. लडाख इज डायिंग, इज इंडिया बिकमिंग अ डिक्टेटरशिप, इलेक्टोरल बॉण्ड्स या विषयांवर केलेले त्याचे व्हिडीओ खूपच व्हायरल झाले.
कोण आहे ध्रुव राठी?
ध्रुव राठीने सुरुवातील ट्रॅव्हल व्लॉग सारखे व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळविली. त्यानंतर तो सामाजिक, राजकीय भाष्य करणारे व्हिडिओ करू लागला. १९९४ साली जन्मलेला ध्रुव राठी अवघ्या २९ वर्षांचा आहे. ध्रुव राठीचे कुटुंब मुळचे हरियाणामधील रोहतकचे असून ते सध्या जर्मनीत वास्तव्यास आहेत. ध्रुव राठीचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी ध्रुव जर्मनीत गेला.
२०२१ मध्ये ध्रुवने ज्युलीशी लग्न केले. २०२२ साली दोघांनी पुन्हा एकदा भारतीय परंपरेनुसार लग्न केले होते.