काही जण सोशल मीडियावर फॉलोअर्स, लाइक्स, व्ह्यूज वाढवण्यासाठी कायदा-सुव्यवस्थेच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. अशाचप्रकारे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र असलेल्या हरिद्वारमध्ये एका यूट्यूबर तरुणाने सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढण्यासाठी असे काही कृत्य केले, ज्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावरच माफी मागण्याची वेळ आली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात हा तरुण रडत हात जोडून सर्वांची जाहीर माफी मागताना दिसतोय. पण, या तरुणाने नेमकं काय केलं जाणून घेऊ…

नेमकी घटना काय?

हरिद्वारमध्ये मांस आणि मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या यूट्यूबरने फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि आपले सिक्स पॅक अॅब्स जगाला दाखवण्यासाठी बिअर चॅलेंज घेऊन हरिद्वारमधील एका ठिकाणी पोहोचला. यावेळी तो रस्त्यावर बॉडी दाखवत लोकांना मोफत बिअर वाटत फिरत होता. अंकुर चौधरी असे या यूट्यूबरचे नाव आहे.

व्हिडीओमध्ये हा यूट्यूबर शर्ट काढून हातात बिअरचे कॅन घेऊन उभा असल्याचे दिसतोय. यानंतर तो ते कॅन रस्त्याच्या कडेला लपवतो. तरुणाने हा रील व्हिडीओ हरिद्वारमधील अशा ठिकाणी बनवला, ज्या ठिकाणी मांस आणि दारू विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात अनेकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

संबंधित यूट्यूबर इन्स्टाग्रामवर रिल्स बनवतो. अनेकदा तो लोकांना बिअर चॅलेंज देताना दिसतो. यामध्ये तो बिअरचे कॅन कुठेतरी लपवून ठेवतो, ज्या नंतर लोक शोधतात. हरिद्वारमध्येही त्याने असाच रील व्हिडीओ बनवला आणि पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तो म्हणताना दिसतोय की, कशी आहे माझी इन्स्टाग्राम फॅमिली; आज आपण हरिद्वारमधील कनखलमध्ये पोहचलो आहोत. तुमचा भाऊ कनखलवाल्यांसाठी आज बिअर घेऊन आला आहे. कनखलवासीयांकडून मला खूप सारं प्रेम मिळते, त्यामुळे मी त्यांच्यासाठी आज काही स्पेशल आणण्याचा विचार केला. यानंतर तो शर्टलेस अवस्थेत बिअरचे कॅन रस्त्याच्या कडेला जाऊन लपवतो. त्याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर नंतर खूप व्हायरल झाला, ज्यावर लोकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

यूट्यूबरने तो व्हिडीओ आता इन्स्टाग्रामवरून हटवला आहे. मात्र, त्याचा तोच रील व्हिडीओ हरिद्वार पोलिसांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला, यानंतर पोलिसांनी त्याच्यावर चालान जारी करत भविष्यात असे व्हिडीओ न बनवण्याचा कडक इशाराही दिला आहे.

हरिद्वार पोलिसांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, तो यूट्यूबर सर्वांची जाहीर माफी मागताना दिसत आहे. यूट्यूबर माफी मागत म्हणतोय की, माझे नाव अंकुर चौधरी, मी रील बनवण्यासाठी कनखलला गेलो होतो. मी रील बनवण्यासाठी बिअर वापरली, त्या भागात मद्यविक्रीवर बंदी आहे हे मला माहीत नव्हते. याप्रकरणी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्यांना माझ्यामुळे त्रास झाला असेल, त्या सर्वांची मी हात जोडून माफी मागतो; भविष्यात माझ्याकडून अशी चूक होणार नाही.