Ranveer Allahbadia alleged girlfriend: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर व पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया ज्याची यूट्यूबवर ‘बीअर बायसेप्स’ अशी ओळख आहे, तो सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रणवीरने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग असलेला रणवीर जेवढा व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय आहे, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडा खाजगी आहे. पण त्याने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढलीय. या पोस्टमध्ये रणवीरने इंग्लंडच्या ट्रिपमधील, तसेच नोव्हेंबर महिन्यातील त्याच्या खास आठवणींचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याचे कुटुंब, मित्र, तसेच पॉडकास्टसाठी आलेल्या बॉलीवूड सेलिब्रेटीज यांच्याबरोबरचे फोटो आहेत. पण, या सगळ्यात त्याने एका खास मुलीबरोबर फोटो शेअर केला आहे, जो पाहून ही तरुणी रणवीरची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रणवीरने शेअर केलेला तो खास फोटो
या पोस्टमध्ये रणवीर एका तरुणीच्या शेजारी पोज देत उभा राहिल्याचे दिसतेय. पण, रणवीरने तिच्या चेहऱ्यावर मुद्दाम एका सूर्यफुलाचा इमोजी लावत तो चेहरा लपवला आहे. आणि त्यामुळेच त्या फोटोमधील ती तरुणी नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. चाहते या फोटोचे एका अभिनेत्रीबरोबर जोडत आहेत.
रणवीरचे इंग्लंड ट्रिपमधील फोटो आणि अभिनेत्री निक्की शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटो थोडेफार सारखे असल्याचे चाहत्यांना दिसून आले. निक्कीने त्याचदरम्यान त्याच इंग्लंडच्या लोकेशन्सवरील फोटो अपलोड केले होते; ज्यामुळे त्यांच्या कनेक्शनबद्दल चर्चा केली जातेय. तसेच अजून एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे रणवीरबरोबर असलेल्या तरुणीचा आउटफिट आणि निक्कीचा आउटफिट अगदी सारखा असल्याने ही शंका व्यक्त केली जात आहे. ‘प्यार का पहला अध्याय : शिवशक्ती’ आणि ‘माईंड द मल्होत्राज’मधील भूमिकांसाठी निक्की प्रसिद्ध आहे.
निक्की शर्माची पोस्ट (Nikki Sharma Instagram Post)
दरम्यान, रणवीर आणि निक्कीच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या डेटिंगची अफवा एक वर्षापासून पसरली आहे; परंतु अद्याप दोघांनीही यावर अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.