हल्ली सोशल मीडिया हे पैसा आणि प्रसिद्धी कमावण्याचे माध्यम झाले आहे. यामुळे अनेक यूजर्स यू-ट्यूबवर रोज वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करून आता कमाई करत आहेत. यात प्रत्येक व्हिडीओला जास्त व्ह्यूज मिळण्यासाठी काही यूजर्स वाटेल ते करायला तयार असतात, ज्यानंतर ते चांगलेच अडचणीत सापडतात. अशा प्रकारे अमेरिकेतील एका यू ट्यूबरने सर्वाधिक व्ह्यूज मिळवण्यासाठी जाणूनबुजून एक विमान अपघात घडवून आणला. यानंतर विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणावरून अपघाताचे सर्व पुरावे नष्ट केल्याने त्याला फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या तपासात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच त्याच्या विमान उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे.
२९ वर्षीय ट्रेवर जेकब हा यू-ट्यूबवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याचे यू-ट्यूबरवर १ लाख ३४ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्याने २३ डिसेंबर २०२१ रोजी विमान अपघाताचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्याला आजपर्यंत २.९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
त्याने एका याचिकेत म्हटले आहे की, त्याने उत्पादन प्रायोजकत्व कराराचा भाग म्हणून तो व्हिडीओ शूट केला होता. पण या प्रकरणी त्याला आता २० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
अमेरिकेच्या न्याय विभागाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की, २९ वर्षीय ट्रेवर जेकब या पायलट आणि स्कायडायव्हरने एक गंभीर अपघात लपवल्याचे कबूल करत, फेडरल तपासात अडथळा आणत आपण केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी असल्याचे मान्य केले आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये जेकबने कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा विमानतळावरून एकट्याने विमानोड्डाण केले. या वेळी त्याने विमानात कॅमेरे बसवले होते. कॅमेऱ्यांसोबत जेकबने त्याच्यासोबत पॅराशूट, तसेच सेल्फी स्टिक घेतली होती.
जेकबचा गंतव्यस्थानी पोहोचण्याचा हेतू नव्हता. यासाठी त्याने उड्डाणाच्या वेळी विमानातून बाहेर पडण्याची योजना आखली होती. त्याने विमान क्रॅश करण्यापूर्वी पॅराशूट घातले होते. त्याचे विमान इतक्या उंचीवर होते, जिथून सुरक्षित लाँडिंग होऊ शकले असते, मात्र जेकबने पॅराशूट घालून विमानातून उडी मारली आणि विमान क्रॅश झाल्याचा व्हिडीओ शूट केला, असे कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या यूएस अॅटर्नीच्या कार्यालयाने सांगितले.
विमान उड्डाणानंतर ३५ मिनिटांनी लॉस पॅड्रेस नॅशनल फॉरेस्टमध्ये कोसळले, यानंतर जेकबने विमान कोसळले त्या ठिकाणी जाऊन व्हिडीओ फुटेज ताब्यात घेतले. या वेळी काही यू-ट्यूबर्सनी या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली होती. कारण जेकबने विमान क्रॅश होण्यापूर्वी आधीच पॅराशूट घातल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्याने विमान सुरक्षितपणे लॅंड करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचेही त्यांना दिसले.
अपघातानंतर जेकबने नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्डला अपघाताची माहिती दिली. ज्यात त्यांनी म्हटले की, या अपघातासाठी जेकब जबाबदार आहेत. पण जेकबने आपल्या याचिकेत दावा केला की, त्याला अपघात झाला त्या ठिकाणाबद्दल माहिती नव्हती. पण तो अपघातस्थळावर हेलिकॉप्टरने परत आला आणि त्याने विमानाचे अवषेश बाहेर काढले आणि नंतर ते नष्ट केले. या प्रकरणी जेकब येत्या काही आठवड्यांत कोर्टात हजर राहील अशी अपेक्षा आहे.