भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लवकरच मैदानात उतरणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र युवराज नक्की कोणत्या टूर्नामेंटसाठी मैदानात उतरणार आहे?, याचा खुलासा त्याने अद्याप केलेला नाही. युवराजच्या चाहत्यांना पुन्हा एकदा युवराजची तुफान फलंदाजी आणि फटकेबाजी पाहण्याचा आनंद मिळणार आहे. मात्र युवराजच्या या खेळीला अद्याप वेळ असतानाच दुसरीकडे युवराजची झलक सध्या नेटकऱ्यांना एका चिमुकल्यामध्ये दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा युवराज हा त्याच्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. टी-२० मध्ये सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावण्याचा पराक्रम युवराजच्या नावे आहेत. त्यामुळे युवराज फलंदाजीला येणार तेव्हा आतषबाजी होणार हे ठरलेलं असतं. पण युवराजच्या याच फटकेबाजीची आठवण सध्या नेटकऱ्यांना एक चिमुकला करुन देतोय. अल्ट न्यूजचे सहसंस्थापक असणाऱ्या मोहम्मद झुबैर यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एक चिमकुला डावखुऱ्या हाताने संयमी पण त्याचवेळी सुंदर फटकेबाजी करताना दिसत आहे.

सामान्यपणे अशा व्हायरल व्हिडीओंमध्ये येणारा प्रत्येक चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या व्हिडीओमधील चिमुकला काही चेंडू खेळून काढताना तर काही अगदी सीमेपार जातील एवढ्या उंचावरुन दूर टोलवताना दिसत आहे. झुबैर यांनी, “युवराज सिंग का छोटा रिचार्ज,” या कॅप्शनसहीत शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घालत आहे. अनेकांना या चिमुकल्याने केलेली फटकेबाजी फारच आवडल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पहायला मिळत आहे. पण हा मुलगा कोण आहे, व्हिडीओ कोणी, कुठे शूट केलाय याची काहीही माहिती समोर आलेली नाही. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान काही दिवसांपूर्वीच युवराजने पुन्हा मी फेब्रुवारीमध्ये खेळपट्टीवर दिसेल असं सांगितलं आहे. “देव तुमच्या ध्येयापर्यंचा रस्ता ठरवत असतो. चाहत्यांच्या विनंतीवरून मी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मैदानात उतरत आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. तुमचे प्रेम नेहमी असेच ठेवा आणि हेच खऱ्या चाहत्यांचं लक्षण आहे,” असं युवराजने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. या पोस्टमध्ये त्याने स्वत:चा २०१७ साली इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या धुवांधार खेळीचा व्हिडीओही पोस्ट केला होता.

युवराज सिंगने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर तो ग्लोबल कॅनडा टी-२० लीग आणि रोड सेफ्टी मालिकेत खेळताना दिसतो. युवराजने देशासाठी साडेअकरा हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १९०० धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८७०१ आणि टी -२० क्रिकेटमध्ये ११७७ धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नऊ, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १११ आणि टी -२० क्रिकेटमध्ये २८ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh ka chota recharge small boys batting video goes viral scsg