भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. धनश्री वर्मा या यू-ट्युबरशी चहलचा साखरपुडा झाला आहे. साखरपुड्यानंतर चहल आयपीएलसाठी दुबईला रवाना झाला. मात्र, दुबईत आयपीएलदरम्यान चहलला होणाऱ्या पत्नीची आठवण येत आहे. युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर धनश्रीसोबतचा फोटो पोस्ट करत रॉमॅंटिक मेसेजही लिहिला आहे.
चहलने होणाऱ्या पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत लिहिलेय की, “तू जे स्मितहास्य मला दिलंय, तेच मी चेहऱ्यावर ठेवलं आहे.” चहलच्या या रोमँटिक मेसेजला धनश्रीने प्रेमळ असा रिप्लाय दिला आहे. पोस्टमध्ये धनश्रीने लिहिलेय की, ‘धन्यवाद, नेहमी असेच हसत राहा.’
सध्या IPLचा १३वा हंगाम मोठ्या जल्लोषात खेळला जात आहे. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाचे खेळाडू आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश करत आहेत. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलदेखील आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित करताना दिसला आहे. चहलच्या फिरकीच्या बळावर आरसीबीचा संघ सध्या गुणतालिकेत आघाडीवर आहे. चार सामन्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवत आरसीबी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
IPL संपल्यानंतर तो लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा ८ ऑगस्टला संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली होती. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.