फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोचे डिलिव्हरी एजंट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता या संदर्भात झोमॅटोचे सह-संस्थापक दीपंदर गोयल यांच्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. एवढ्या मोठ्या कंपनीची धुरा सांभाळतानाच ते किमान तीन महिन्यातून एकदा होम डिलिव्हरी करतात. यासाठी ते कंपनीचा ट्रेडमार्क असलेला लाल टी शर्ट घालून डिलिव्हरी करतात. मात्र आजपर्यंत त्यांना कोणीही ओळखू शकलेलं नाही, असे Naukri.com चे मालक संजीव बिखचंदानी यांनी एक ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपिंदर गोयल दर तीन महिन्यांनी किमान एकदा कंपनीचा ट्रेडमार्क लाल टी-शर्ट परिधान करून डिलिव्हरी बॉयची भूमिका पार पाडतात. याबाबत माहिती देताना बिखचंदानी म्हणतात, ‘नुकतेच मी झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल आणि त्यांच्या संपूर्ण टीमला भेटलो. मला हे जाणून खूप आनंद झाला की, दीपंदरसह सर्व वरिष्ठ व्यवस्थापक लाल रंगाचा झोमॅटो टी-शर्ट घालून, दुचाकीवरून दिवसभर फूडची डिलिव्हरी करतात. साधारण तीन महिन्यातून एकदा ही फूड डिलिव्हरी केली जाते. ‘पुढच्या वेळी तुमच्या घरी झोमॅटो डिलिव्हरी एजंट आल्यास त्याच्याकडे निरखून पहा, कदाचित तो कंपनीचा सीईओ असू शकतो,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला, Uber इंडियाचे सीईओ आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंह यांनी त्यांच्या प्राथमिक संशोधनाचा एक भाग म्हणून एका दिवसासाठी कॅब चालवली आणि अनेक प्रवाशांना खाली उतरवले. अनेकांनी त्यांना ओळखले आणि त्यांचे अनुभव LinkedIn वर शेअर केले.