झोमॅटोचे सीईओ दीपेंदर गोयल यांनी एक मोठा निर्णय घेतला असून त्यासाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशामधील आघाडीच्या फूड डिलेव्हर ॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या गोयल यांनी त्यांचा ईएसओपीमधील निधी दान करण्याचा निर्णय घेतलाय. गुंतवणूकदार आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये समावेश असल्याने कंपनीकडून कर्मचारी म्हणून गोयल यांना कंपनीच्या हिस्सेदारीपैकी काही भाग देण्यात आलाय. हीच रक्कम ते झोमॅटो फ्यूचर फाउंडेशनला दान करणार आहेत.
झोमॅटोच्या सध्याचे शेअर्सचे दर पाहिले असता ही रक्कम ९० मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ७०० कोटी रुपये इतकी होते, असं गोयल यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त ‘द इकनॉमिक्स टाइम्स’ने दिलंय.
झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या गोयल यांनी जारी केलेल्या पत्रामध्ये, “झोमॅटो फ्यूचर फाउंडेशनचं हित लक्षात घेता तसेच आपल्या समभागधारकांच्या भल्यासाठी मी हे सर्व शेअर्स सध्या लिक्वीडेट करु इच्छित नाही. मी ते काही वर्षांमध्ये लिक्वीडेट करेन. पहिल्या वर्षी मी यामधील १० टक्क्यांहून कमी शेअर्स फाउण्डेशनसाठी लिक्वीडेट करेन,” असं गोयल म्हणालेत.
फाउंडेशन कर्मचाऱ्यांकडूनही निधी स्वीकारणार असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. तसेच निधी गोळा करण्यासाठी विशेष मोहीमसुद्धा साबवली जाणार असल्याचं त्याप्रमाणे या फाउंडेशनच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी समिती नेमण्याचं संकेत गोयल यांनी दिलेत.
झोमॅटो फ्यूचर फाउंडेशनच्या माध्यमातून झोमॅटोच्या डिलेव्हरली पार्टनर म्हणजेच डिलेव्हर बॉइजच्या पहिल्या दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. दरवर्षी प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी डिलेव्हरी बॉइजला ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या असून त्यापैकी प्रमुख अट म्हणजे मागील पाच वर्षांपासून संबंधित डिलेव्हरी बॉय कंपनीसोबत काम करत असावा ही आहे. जर हा डिलेव्हरी बॉय कंपनीसोबत १० वर्षांपर्यंत काम करत असेल तर त्याच्या मुलांसाठी दर वर्षी एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाईल असं सांगण्यात आलंय.
मात्र झोमॅटोच्या या अटी फारच जाचक असल्याचं मत व्यक्त केलं जातंय. तज्ज्ञांनी ईटीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार झोमॅटोचे अनेक डिलेव्हरी बॉइज अगदी काही महिन्यांमध्ये नोकरी सोडतात. मात्र या अटी शर्थींबरोबरच मार्कांच्या आधारे झोमॅटोकडून डिलेव्हरी बॉइजच्या मुलांना उच्च शिक्षणासाठीही आर्थिक मदत केली जाणार आहे.
शैक्षणिक मदतीशिवाय या फाउंडेशनच्या माध्यमातून नोकरीदरम्यान जखमी झालेल्या डिलेव्हरी बॉइजला सर्वपद्धतीची आर्थिक मदत कंपनीकडून केली जाणार आहे.