Zomato Customer Finds Sharp Object in Food: हॉटेलमधून मागविलेल्या अन्नपदार्थांमध्ये अळ्या, झुरळ किंवा प्लास्टिकसारखी वस्तू सापडल्याच्या तक्रारी सोशल मीडियामुळे आता नियमितपणे समोर येताना दिसतात. त्यामुळेच या खाद्यपदार्थांचा दिवसेंदिवस घटत चाललेला दर्जा हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. आपले आई-बाबा नेहमी सांगतात, “बाहेरचे पदार्थ खाऊ नका. घरात जेवण करा.” कारण- कितीही भारी हॉटेल असलं तरी तिथे किती स्वच्छता असेल ते सांगता येत नाही. अनेक हॉटेल्स बाहेरून चकाचक दिसतात; पण जर तुम्ही त्यांचं किचन पाहिलं, तर उलटीच येईल इतकी अस्वच्छता तिथे असते. अशा अस्वच्छ हॉटेलांचे अनेक व्हिडीओ तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता. आता हेच प्रकरण पाहा ना एका व्यक्तीने झोमॅटोवरून जेवण मागवले होते. अर्थात, ठरलेल्या वेळेत हे जेवण तिच्या घरी पोहोचले खरे. पण जेव्हा ते खाताना त्यामध्ये चक्क ब्लेडसारखी एक धारदार वस्तू सापडली आहे, हे आता तुम्हीच पाहा. हा प्रकार पाहून खरंच तुम्हीसुद्धा अवाक् व्हाल.
पुन्हा कधीच बाहेरचं जेवण खाणार नाही
झोमॅटोच्या ग्राहकाला खाण्यात धारदार वस्तू आढळल्याची घटना समोर आली. “मी अफगाणी चाप आणि दोन रुमाली रोट्या मागवल्या होत्या. त्यावेळी एक धारदार वस्तू मला त्यामध्ये सापडली. त्यामुळे अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळणे योग्य नाही”, अशी टीका ग्राहकाने लिंक्डइनवर केली आहे. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ९ जुलै रोजी ही घटना समोर आली.
निराश झालेला ग्राहक करण आर्यनने झोमॅटोवर टीका करताना लिहिले, “लोकांच्या जीवाशी खेळणे चांगले नाही.” दरम्यान, ग्राहक करण आर्यनने याची तक्रार केली असता, त्यांना सहकार्य केलं गेलं नसल्याचं ते सांगतात. त्यांनी असंही सांगितलं की, अनेक वेळा विचारणा करूनही कुणीही त्यांची तक्रार ऐकून घेतली नाही. विशेष म्हणजे परतावा देण्यासही नकार दिला जातोय. दरम्यान, आर्यन यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने माफी मागितली आहे.
पाहा पोस्ट
हेही वाचा >> VIDEO: स्वत:च्या आनंदासाठी प्राण्यांच्या जीवाशी खेळ; पर्यटकानं पाणघोड्याच्या तोंडात टाकली प्लास्टिकची पिशवी
यापूर्वीदेखील असाच प्रकार घडला होता. बंगळुरूमधील एका तरुणीनं चिकन फ्राईड राईस मागवलं होतं. त्यामध्ये मेलेली पाल सापडली होती. त्यामुळे सध्या झोमॅटोवर टीका केली जात आहे. या महिलेचं ट्वीटदेखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही नेटकरी या ट्वीटचा आधार घेत, अशा अस्वच्छ पदार्थ विकणाऱ्या हॉटेलमालकावर कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करताना दिसत आहेत. असो, तुम्हाला काय वाटतं? असे प्रकार घडल्यास प्रशासनानं कुठली कारवाई केली पाहिजे? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.