टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्टच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने धोनीच्या सन्मानार्थ झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पेशल डिस्काउंटची घोषणा केली. मूळ रांचीचा रहिवासी असलेला धोनी निवृत्त झाला म्हणून झोमॅटोने आपल्या रांचीतील ग्राहकांसाठी 100 टक्के डिस्काउंटची (183 रुपयांपर्यंत) ऑफरची घोषणा केली.

‘देशाला एक महान खेळाडू देणाऱ्या शहरासाठी गिफ्ट’, अशा आशयाचं ट्विट करत झोमॅटोने या ऑफरची माहिती दिली. डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ऑर्डर करताना MAHI कोड वापरणाऱ्याची अट होती.  खरंतर कंपनीची ही ऑफर रविवारी संपली. पण, कंपनीच्या या ऑफरवर एका नेटकऱ्याने आक्षेप घेतला आणि झोमॅटोच्या ट्विटवर, “जरी धोनी रांचीचा असला तरी सर्व देश धोनीवर प्रेम करतो…मग डिस्काउंटची ऑफर सगळ्या देशासाठी का लागू करु नये?” असं म्हटलं. एकप्रकारे या युजरने देशभरात ‘माही डिस्काउंट’ देण्याची मागणी केली होती.

त्यावर झोमॅटोनेही मजेशीर उत्तर दिलं आहे.  झोमॅटोने त्या युजरच्या ट्विटला रिप्लाय देताना बॉलिवूडचा सिनेमा ‘फिर हेरा फेरी’मधील एक मीम शेअर केलं. या मीममध्ये अक्षय कुमार आणि राजपाल यादव दिसत असून त्यावर ‘भाई इतने पैसे तो नहीं मेरे पास’ असा मेसेज आहे. झोमॅटोचा हा रिप्लाय पाहून नेटकऱ्यांना हसू आवरता आलं नाही.

झोमॅटोचं उत्तर नेटकऱ्यांना चांगलंच आवडलं असून आतापर्यंत या रिप्लायला जवळपास 4500 पेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. त्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत असून या फोटोमुळे अन्य काही मीम देखील व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, 39 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्याच्या 15 वर्षांच्या शानदार कारकिर्दीला पूर्णविराम लागला. धोनीने इन्स्टाग्रामवरुन निवृत्तीची घोषणा केली.

Story img Loader