कालच व्हॅलेन्टाईन्स डे जगभरात मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने साजरा झाला आहे. अनेक जण या दिवशी जोडीदारासह सिनेमा पाहण्यासाठी, हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करतात. लहान-मोठ्या भेटवस्तू देऊन त्यांना खुश करतात, आपले प्रेम दर्शविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ज्यांना या सगळ्या गोष्टी कोणत्याही कारणांमुळे प्रत्यक्षात करता येत नाही ते ऑनलाइन डिलिव्हरी ॲपचा वापर करून एखादी वस्तू त्यांच्या जोडीदारापर्यंत पोहोचवतात.
असेच काहीसे दिल्लीमधील एका तरुणाने केले आहे. तरुण नावाच्या एका व्यक्तीने व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त, एक-दोन नव्हे, तर चक्क १६ केक झोमॅटोवरून ऑर्डर केले होते. मात्र, एवढे केक मागवले यात काय विशेष आहे असे तुम्हाला वाटत असेल; तर हे सगळे १६ केक वेगवेगळ्या पत्त्यांवर पाठवण्यात आले होते.
हेही वाचा : स्लॅप डे, किक डे अन् ….; कसा साजरा केला जातो ‘Anti-Valentine’s Week’ जाणून घ्या
एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरून स्वतः झोमॅटोने असे सांगणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये, “वेगवेगळ्या पत्त्यांवर एकूण १६ केक पाठवणाऱ्या दिल्लीतील तरुणला व्हॅलेंटाइन्स डेच्या खूप शुभेच्छा”, असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर एकापेक्षा एक अशा प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये अनेकांनी त्यांच्या ‘तरुण’ नावाच्या मित्रांना टॅग केले आहे, तर अनेकांनी झोमॅटो असे चुगलीखोरांसारखे वागू नकोस, असे म्हटल्याचे आपण पाहू शकतो. नेटकऱ्यांच्या यावर नेमक्या प्रतिक्रिया पाहा.
एकाने, “हा मुलगा झोमॅटोचा सर्वाधिक वापर कसा करायचा हे पाहतो आहे,” असे म्हटले आहे. अनेकांनी ही पोस्ट वाचून त्यांच्या तरुण नावाच्या मित्रांना टॅग केले आहे, तर काहींनी टॅग करून “तरुण, हे तुझं काम तर नाही ना?” असा प्रश्न विचारला आहे. अजून एकाने, “बिचाऱ्या तरुणची तर आज चांगलीच पोलखोल झालेली दिसते”, असे म्हटले आहे. तर तिसऱ्याने, “देवा या तरुणबरोबर तर #’मोये-मोये झाले आहे” असे लिहित खिल्ली उडवली. चौथ्याने, “झोमॅटो असं नको करूस मित्रा… तू इतर सर्वांपेक्षा चांगला आहेस रे” असे म्हटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “झोमॅटोचे हे वागणे म्हणजे, चाळीतल्या त्या चुगलखोर काकूंसारखे आहे…” असे लिहिले आहे.
हेही वाचा : फॅशन म्हणून चक्क पायात घातला उंदराचा पिंजरा! पाहा हा Video पाहून तुम्ही चक्रावून जाल
झोमॅटोची पोस्ट पाहा :
ही पोस्ट एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरून झोमॅटोच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर झाली आहे. या पोस्टला आत्तापर्यंत ६५८.९K इतके व्ह्यूज आणि ११.३K लाईक्स मिळाले आहेत.